ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाकयुद्ध रंगल्याचे महाराष्ट्राने पाहिले. एकमेकांना अरे-तुरे करेपर्यंत हा वाद पोहोचला होता. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला असून आता पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे. काल (दि. २१ डिसेंबर) सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत होते. पण ही चर्चा निष्फळ ठरली. त्यावरून छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टोलेबाजी केली. “जरांगे यांच्या मनात रोज नवनवीन कल्पना येतात. त्यावर सरकारने लवकर निर्णय घ्यावा”, अशी मागणी करतो असे भुजबळ यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> ‘सोयरे’ शब्दावरून सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ; गिरीश महाजन, “तर आरक्षण देता येत नाही…”

अंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले बांधा

छगन भुजबळ म्हणाले, “आपण जरांगेचे ऐकलं पाहीजे. नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील. आणखी काहीतरी करतील. त्यामुळे आपण व्याहींचे व्याही, त्यांचे व्याही यांना ताबडतोब आरक्षण दिलं पाहीजे. माझं तर म्हणणं आहे की, मंत्री महोदय सारखे सारखे त्यांना भेटायला अंतरवाली सराटी येथे जात आहेत. ते फार अडचणीचं होतं. त्यामुळे तिथे दोन-चार सरकारी बंगले बांधले पाहीजेत. मुख्य सचिवांचे एक कार्यालय तिथे स्थापन केले पाहीजे. जरांगेंनी सांगितल्यानंतर मंत्र्यांनी ऑर्डर काढून मुख्य सचिवांनी त्याला तात्काळ मंजुरी देऊन टाकावी. तसेच माजी न्यायाधीशांच्या समितीचेही कार्यालय तिथे थाटावे, म्हणजे जरांगे म्हणतात त्याप्रमाणे अहवाल तयार करता येईल.”

देवही जरांगेंना घाबरतो

“जरांगे पाटील यांच्या मागण्या तर्काला धरून आहेत, नियमाला धरून आहेत. सरकारच त्यांचे काही ऐकत नाही, असे चित्र निर्माण झालेले दिसते. जरांगेच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहीजेत. जरांगेनी सरकारला वेठीस धरले आहे, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता भुजबळ म्हणाले की, जरांगेनी सरकारला वेठीस धरलेले नाही तर सरकारनेच जरांगेना वेठीस धरले आहे. तसेच मी याआधी केलेली माझी सर्व भाषणे मागे घेत असून जरांगेच्या अभिनव कल्पनांना मान्यता देत आहे. कायदे बदलून टाकावेत. पुढच्या मेळाव्यात मी त्यांच्याबाजूने भाषणे करणार आहे”, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी लगावला.

हे वाचा >> Maratha Reservation : “दोन दिवसांत काहीच केलं नाही तर…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला…

तसेच यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की, देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच, असे जरांगे पाटील म्हणत आहेत. त्यावर पुन्हा भुजबळ म्हणाले की, ते देवालाही घाबरत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर सरकार काय करणार? असा टोला भुजबळ यांनी लगावला.

जरांगे एससी/एसटीतूनही आरक्षण मागू शकतात

जरांगे पाटील यांच्यावर बोलत असताना भुजबळ म्हणाले की, ही माझी हतबलता म्हणा, मी घाबरलो म्हणा… काहीही म्हणा. पण जरांगे यांनी उद्या एससी / एसटीमध्ये आरक्षण मागितले तर त्यातही त्यांना आरक्षण देऊन टाका, असे भुजबळ म्हणाले. तसेच आता आरक्षणाच्या बाबतीतच नाही, तर पुढे ते शेतकरी, शिक्षण आणि विकासाच्या बाबतीतही सूचना देतील. त्या आपल्याला ऐकायला हव्यात. जरांगे यांच्यापाठी मराठा समाजाचे एवढे मोठे पाठबळ आहे, ते सरकारच्या विरोधात गेले तर कसं होईल? सरकारला काही भीती वाटते की नाही? त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहीजेत, असेही भुजबळ म्हणाले.

“सरकारने काय वाटाघाटी केली? हे मला माहीत नाही. पण मला स्वतःला हे योग्य वाटत नाही. सुरुवातीला जरांगे पाटील म्हणाले, निजामशाहीतील लोकांना दाखले द्या, ते सरकारने मान्य केलं. नंतर मराठवाड्यातील लोकांना दाखले द्या, तेही मान्य झाले. मग संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी मागणी केली, तीही मान्य झाली. आता ते आईकडच्या लोकांना दाखले द्या, आईकडच्या नातेवाईकांना दाखले द्या.. मग याही मागण्या आता मान्य करा”, अशी उपरोधिक टीका भुजबळ यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal ironic criticism on manoj sarange patils demands on maratha reservation kvg
Show comments