मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि महायुतीमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची वक्तव्ये महायुतीच्या धोरणाशी विसंगत असल्याचे दिसत होते. पंतप्रधान मोदी आणि भाजपाची ४०० पारची घोषणा असेल, विधानसभेसाठी ९० जागांची मागणी आणि मनुस्मृतीवरून झालेला वाद असेल, या विषयांमध्ये छगन भुजबळ यांनी केलेली विधाने ही महायुतीच्या विरोधात असल्याचे म्हटले जाते. लोकसभेची उमेदवारी मिळू शकली नाही म्हणून भुजबळ यांची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असताना आता स्वतः भुजबळ यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. नाशिक येथे माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांना नाराजीचे कारण विचारण्यात आले, त्यावर त्यांनी मनुस्मृतीचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मी नाराज वैगरे काही नाही. मी फुले-शाहू-आंबेडकर आणि समता परिषदेच्या विचारांचा पाईक आहे. मला खोटं बोलणं जमत नाही, त्यामुळे मी माझी स्पष्ट मतं मांडतो. विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. त्यामुळेच मी जितेंद्र आव्हाडांच्या मनुस्मृती जाळण्याच्या कृतीचे समर्थन केले. तसेच त्यांच्या हातून अनवधानाने चूक झाल्याचे म्हटले. मुंबईहून एवढ्या दूर महाड येथे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यासाठी गेले नव्हते. त्यांच्याकडून चूक झाली. पण मनुस्मृतीबाबत त्यांनी जे आंदोलन हाती घेतले, ते योग्यच आहे”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज्यसभेसाठी आग्रही नाही

छगन भुजबळ यांना राज्यसभा हवी आहे का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, राज्यसभेचं सोडा, मी लोकसभेलाही माघार घेतली. मला राज्यसभा वैगरे नको. आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच त्यांना आजच्या दिवशी अभिवादन केले पाहीजे. मनुस्मृतीनुसार महिलेला कोणताही अधिकार नाही. महिलेला स्वतंत्र मत नाही, तिला धनसंचय करण्याचा अधिकार नाही. या पार्श्वभूमीवर अहिल्याबाई होळकर यांचे कर्तृत्व कितीतरी मोठे आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून आज महापुरुषांच्या विचारांना उजाळा देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांनी मानले छगन भुजबळांचे आभार

छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याने जितेंद्र आव्हाडांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, “भुजबळ साहेब, अनवधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal is unhappy in mahayuti referring manusmriti and support jitendra awhad kvg
Show comments