छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा करतात. घटनेच्या पदावर बसून तेढ निर्माण करण्याचं काम कलंकित नेता म्हणून भुजबळ करत आहेत. भुजबळ महाराष्ट्राला लागलेले कलंक आहेत, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे. बीडमधील दंगल भुजबळांनीच घडवून आणली, अशी शंकाही जरांगे-पाटलांनी उपस्थित केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
जरांगे-पाटील म्हणाले, “भुजबळांच्या पाहुण्यानेच त्याचं हॉटेल जाळलं. ते भुजबळांना दिसत नाही. पण, मराठ्यांच्या निष्पाप लोकांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहेत. हॉटेल जाळणाऱ्या भुजबळांच्या पाहुण्याला अटक का करण्यात आली नाही?”
“…तेव्हा भुजबळ झोपले होते का?”
“बीडमधील लोकांना कोंडून मारण्यात आल्याचं भुजबळ सांगतात. मग, अंतरवालीतील लोकांना घरात कोंडून मारलेलं, तेव्हा भुजबळ झोपले होते का? जातीयवादी नसल्याचं भुजबळ सांगतात. तर, अंतरवालीत येण्यास काय झालं होतं?” असा सवाल जरांगे-पाटलांनी भुजबळांना विचारला आहे.
“फडणवीसांनी भुजबळांना बळ देऊ नये”
“भुजबळ म्हणत होते, ‘दंगल घडवणाऱ्यांना नंबर देण्यात आली होती.’ पण, पोलिसांच्या रेकॉर्डला असं काहीच नाही. बीडमधील दंगल भुजबळांनी घडवून आणली, अशी शंका आम्हाला वाटत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांना बळ देऊ नये,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
“भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत”
“भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी निष्पाप २ ते ४ हजार लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अंतरवालीतील लोकांना भुजबळांचं ऐकूनच अटक करण्यात आली आहे. भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे भुजबळांना बळ देऊन सरकारनं मराठ्यांचं वाटोळं करू नये,” असं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं आहे.
“भुजबळांवरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत”
“भुजबळांनी महाराष्ट्र सदन खाल्लं. पण, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत. फडणवीसांची दिशा अन्याय होणाऱ्यांवर न्याय देण्याची आहे की भ्रष्टाचार करून महाराष्ट्र खाणाऱ्यांना साथ देण्याची?” असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.