राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध टोकाला गेलं आहे. छगन भुजबळांनी शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) मनोज जरांगेंचा वारंवार एकेरी उल्लेख करत बोचरी टीका केली. “तुझ्यासारखं मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, अशी एकेरी व्यक्तिगत टीकाही भुजबळांनी केली. ते जालन्यातील आंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार मोर्चात बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “सगळ्या आयोगांनी सांगितलं की, मराठा आरक्षण देता येणार नाही. त्यात आमचा दोष आहे का? आम्ही काय केलं आहे? आम्हाला आरक्षण घटनेने दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, मंडल आयोगाने दिलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केलं. यांना काहीच माहिती नाही. हे सकाळी उठतात आणि आमची लेकरं बाळं, आमची लेकरं बाळं बोलतात.”

“त्यांच्यासारखं मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”

“त्यांना केवळ दोन शब्दच येतात. ते दोन शब्द म्हणजे आमची लेकरंबाळं. बाकीच्यांची काय लेकरं बाळं नाहीत का? पुढे ते सांगतात की, छगन भुजबळ दोन वर्षे तुरुंगात बेसण भाकर खाऊन आला. हो, खाऊन आलो. मी छगन भुजबळ दिवाळीतही बेसण, भाकर, ठेचा कांदा फोडून खातो. मात्र, मी स्वकष्टाचं खातो. त्यांच्यासारखं मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही,” अशी बोचरी टीका छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर केली.

हेही वाचा : “तुझं खातो का रे?”; मनोज जरांगेंवर टीका करताना छगन भुजबळांची जीभ घसरली, म्हणाले…

“आरक्षणाने दलित-ओबीसींचीही गरीबी दूर झालेली नाही”

एक लक्षात ठेवा आरक्षण गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आज ७५ वर्षे झालीत, दलितांना संविधानाने आरक्षण दिलं. त्यामुळे दलित समाजातील लोक पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी अशा अनेक मोठ्या पदांवर गेले. मात्र, झोपडपट्टीत आजही आमचा दलित गोरगरीब बांधव राहतो. गरीबी दूर झाली नाही. ओबीसींचीही गरीबी दूर झालेली नाही. हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. वर्षानुवर्षे दबलेले, पिचलेले आहेत अशा लोकांना इतरांच्या बरोबरीने वर आणण्यासाठी आरक्षण आहे.

Story img Loader