Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar Update : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज सकाळीच वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. काल त्यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेनंतर त्यांनी आज कोणतीही पूर्वसूचना न देता भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, यासंदर्भात आज छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही राजकीय भेट नसून राज्यातील स्फोटक परिस्थितीत शरद पवारांनी लक्ष घालावं याकरता ही भेट घेतली असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar)
शरद पवारांची प्रकृती खराब
छगन भुजबळ म्हणाले, मी आज पवारांकडे सकाळीच गेलो होतो.अर्थात त्यांची अपॉइंटमेंट घेतली नव्हती. फक्त ते तिथे आहेत तेवढं कळलं होतं. त्यामुळे साडेदहाला तिथे गेले होते. परंतु, प्रकृती बरी नसल्याने ते झोपलेले होते. त्यामुळे मी एक-दीड तास थांबलो. त्यानंतर ते उठले आणि त्यांनी मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपले होते. प्रकृती बरी नसल्याने ते उठले आणि बाजूला खूर्ची ठेवून आम्ही दीड तास चर्चा केली.” (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar)
राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याने आलो
“मी त्यांना सांगितलं, मी कोणतंही राजकारण घेऊन आलेलो नाही. मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. कोणतीही पक्षीय भूमिका नाही. पण महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत, काही लोक ओबीसी, धनगर, वंजारी, माळी समाजाच्या दुकानात मराठा समाजातील माणूस जात नाही. अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता ही शांतता राज्यात निर्माण झाली पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले. (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar)
सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्या
मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत असताना मराठवाडा पेटला होता. त्यावेळी पवारांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली, याचीही आठवण त्यांनी आज करून दिली. याबाबत भुजबळ पुढे म्हणाले की, “मराठा, ओबीसी नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे मला माहिती नाहीत असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत ते मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा करणार, असं शरद पवार म्हणाले असल्याचं भुजबळ म्हणाले. तसंच, येत्या काळात सर्वपक्षीय बैठक घेण्याचं त्यांना सुचवण्यात आलं आहे. (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar)
शरद पवारांनी या चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली आहे. परंतु, त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते येत्या एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले. तसंच, राज्यातील तंग झालेलं वातावरण शांत व्हावं, हा या भेटीमागचा हेतू आहे. मराठा आणि ओबीसींवर अन्याय होऊ नये याकरता मी कोणालाही भेटायला तयार आहे. अगदी राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटेन, असं छगन भुजबळ म्हणाले.
“मी घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर चर्चा केली होती. शरद पवारांशी मी या विषयावर चर्चा करणार आहे, असं मी प्रफुल्ल पटेलांना कळवलं होतं”, असंही ते म्हणाले.