Chhagan Bhujbal Meeting with Sharad Pawar over OBC Reservation : मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छगन भुजबळ यांनी बारामतीमधील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही भुजबळांनी केला होता. या टीकेनंतर अवघ्या काही तासांमध्ये छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी (मुंबईतील सिल्व्हर ओक बंगला) येथे दाखल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता भुजबळ पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेले. तिथे काही वेळ वाट पाहिल्यानंतर भुजबळांना शरद पवार यांना भेटता आलं. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापलं असून यामध्ये शरद पवार यांनी लक्ष घालावं अशी विनंती भुजबळ यांनी या भेटीवेळी केली. मात्र या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
या भेटीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, “छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. ते कुठल्याही प्रकारचा वेगळा निर्णय घेणार नाहीत. महायुती डॅमेज (नुकसान) होईल असा निर्णय ते घेणार नाहीत. उलट छगन भुजबळ हे महायुती कशी एकत्र राहील यासाठी प्रयत्न करत असतात. महायुतीची एकजुट कशी कायम राहील यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. तसेच कोणत्याही नेत्याने शरद पवारांना भेटण्यात काही गैर नाही. आम्ही अनेकदा त्यांना किवा आमच्या वरिष्ठांना भेटत असतो. काही विषय असे असतात, ज्यासाठी वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. राज्याच्या हितासाठी वरिष्ठांना भेटण्यात काही गैर नाही. या भेटीचा कोणीही कुठलाही राजकीय अर्थ काढू नये.”
महायुतीत भुजबळांची हेळसांड : सुप्रिया सुळे
दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील प्रश्न विचारला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महायुतीत छगन भुजबळांची हेळसांड होत असावी, तशी शक्यता नाकारता येत नाही.” तसेच यावेळी खासदार सुळे यांना भुजबळ तुमच्या पक्षात येतील का? असा प्रश्न विचारला. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोण येणार? हा निर्णय संघटनेचा आहे. संघटनेतील सर्व सदस्य मिळून असे निर्णय घेतात. कुठलीही एक व्यक्ती असा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही.”
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : “फडणवीसांनी भुजबळांना तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, आता ते…”, शरद पवार-भुजबळ भेटीवरून मनोज जरांगेंचं वक्तव्य
सुनील तटकरे म्हणाले, “अफवा पसरवू नका”
दरम्यान, भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे अनेकजण वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. भुजबळांच्या नाराजीचीही चर्चा आहे. यावर भुजबळांचे त्यांच्या पक्षातील सहकारी खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाले, छगन भुजबळ नाराज असण्याचं काहीच कारण नाही. काल बारामतीत आमच्या पक्षाच्या मेळाव्यात ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तिथे त्यांनी भाषण केलं. त्यामुळे कोणीही विनाकारण कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. ते राज्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत, ते एक मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने राज्याच्या राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.