Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (१५ जुलै) सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना भुजबळांनी नामोल्लेख टाळत शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर आज ते कुठलीही पूर्वसूचना न देता ते शरद पवारांना भेटायला गेले. या भेटीमुळे राज्यभर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच भुजबळांनी पवारांच्या भेटीनंतर स्पष्ट केलं की ही भेट राजकीय नव्हती. राज्यातील स्फोटक परिस्थितीत शरद पवारांनी लक्ष घालावं यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी मी ही भेट घेतली.
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला आहे. या प्रकरणात शरद पवार यांनी लक्ष घालावं, अशी विनंती करण्यासाठी भुजबळांनी पवारांनी ही भेट घेतली आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीने मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केली. यावेळी जरांगे यांना या भेटीवर प्रतिक्रिया विचारल्यावर जरांगे पाटील म्हणाले, “मी या भेटीवर काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण राजकारण हा माझा अजेंडा नाही.”
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले, “राज्यातील मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.” तसेच भुजबळ यांनी शरद पवारांना याप्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. ते पवारांना म्हणाले, “राज्यातील सध्याची परिस्थिती विस्फोटक बनली आहे.” भुजबळांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यात अशी परिस्थिती छगन भुजबळ यांनीच निर्माण केली आहे. त्यांनीच सर्वात आधी कोयत्याची भाषा वापरली आणि तिथून हे सगळं सुरू झालं.”
“भुजबळांनी सर्वात आधी कोयत्याची भाषा वापरली”
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आंबडला छगन भुजबळ यांनी एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यात त्यांनी सर्वप्रथम कोयत्याची भाषा वापरली, हातपाय तोडण्याची भाषा वापरली. त्यानंतर काही ओबीसी नेते हाताखाली घेऊन भुजबळांनी ओबीसी नेते व आमच्यात वाद सुरू केले. कुकरी, कोयते व कत्त्यांची भाषा वापरली. राज्यात ही स्फोटक परिस्थिती त्यांनीच निर्माण केली आहे. गोरगरीब मराठा, गोरगरीब ओबीसी संपावे हाच या सगळ्या लोकांचा मुख्य उद्देश आहे. याबाबत कोणाला काही सांगून उपयोग नाही.”
भुजबळांनी शरद पवारांचा कार्यक्रम वाजवला : मनोज जरांगे
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते म्हणाले, “छगन भुजबळ ज्या ताटात खातो, त्याच ताटात थुंकणारा माणूस आहे. ज्या माणसांनी त्याला मोठं केलं, त्या सर्वांशी त्याने बेईमानी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मंत्रीपद दिलं, तुरुंगात जाण्यापासून वाचवलं, तरी तो मागे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल भयानक बोलला होता. त्याने नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याला शिवसेनेने मोठे केलं, त्याने शिवसेनेचे खाल्लं आणि त्याने शिवसेनाच फोडली. शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, मात्र त्याच शरद पवारांचा योग्यवेळी छगन भुजबळ यांनी कार्यक्रम वाजवला. कारण भुजबळ बेईमान माणूस आहे.”