Will Chhagan Bhujbal Become Governor? : देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. यामध्ये ३९ मंत्र्यांनी शपथ गेतली. त्यात ३३ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, यात काही वरीष्ठ, इच्छुक आमदारांना डच्चू मिळाल्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचं चित्र निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांचं नाव मंत्रीमंडळ यादीत समाविष्ट नसल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. खुद्द छगन भुजबळांनी “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रेहना”, असं सूचक विधान करत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी छगन भुजबळांबाबत मोठं विधान केलं आहे.

अनेक विद्यमान मंत्र्यांना नव्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये डच्चू देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला असता आशिष देशमुख यांनी ही बाब फेटाळून लावली. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “डच्चू देण्याचा प्रश्नच नाही. नवीन सरकार स्थापन झालंय. महायुतीच्या प्रत्येक पक्षाचे मोठ्या संख्येनं आमदार निवडून आले आहेत”, असं ते म्हणाले.

छगन भुजबळांबाबत मोठा निर्णय?

दरम्यान, छगन भुजबळांबाबत नक्कीच मोठा निर्णय होणार असेल, असं सूचक विधान आशिष देशमुख यांनी केल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. “आम्ही सगळे ओबीसी समाजातून येतो. आम्ही एकत्र येऊन वेळ आली तेव्हा छगन भुजबळांसोबत आंदोलनही केलं आहे. आज अजित पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना मंत्रीमंडळाच्या बाहेर ठेवलं असेल तर त्यांच्याबाबत नक्कीच काहीतरी मोठा निर्णय होणार असेल असं मला वाटतं”, असं आशिष देशमुख म्हणाले.

“कदाचित त्यांना या देशाच्या कुठल्यातरी राज्याचे राज्यपाल म्हणून नेमलं जाणार असेल. छगन भुजबळांना ते पद देण्याची योजना त्यांच्या पक्षानं केली असेल. म्हणून त्यांचं मोलाचं योगदान येणाऱ्या काळात सामाजिक जीवनात पाहायला मिळू शकेल”, असं आशिष देशमुख यांनी नमूद केलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

दरम्यान, छगन भुजबळांनी आज नाशिकमध्ये समता परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आपल्याला मंत्रीपद देण्यासाठी आग्रही होते, असं विधान केलं आहे. “सर्व कार्यकर्त्यांच्या मानत राग व निराशा आहे. मला मंत्रीपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल. पण प्रश्न माझ्या मंत्रीपदाचा नसून ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. मला लोकसभेला उभण राहण्याचा अग्रह करण्यात आला. त्यानुसार मी तयारीही केली होती. पण माझं नावच जाहीर केलं नाही. मग मीच माघार घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा मला मंत्रीमंडळात घेण्यासाठी आग्रह होता हे मला कळलेलं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal: “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली

त्यामुळे आता छगन भुजबळांच्या मंत्रीपदावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

Story img Loader