Chhagan Bhujbal : महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबरला आणि खातेवाटप २१ डिसेंबरला झालं. या मंत्रिमंडळातून डावललं गेल्याने छगन भुजबळ हे प्रचंड नाराज झाले आहेत. सोमवारीच छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातून सध्या विस्तव जात नाही अशी स्थिती आहे. दरम्यान या सगळ्यामागे २००९ चा एक प्रसंग आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संघर्ष २००९ पासूनच सुरु झाला अशाही चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्याने याबाबत सांगितलं आहे. त्यामुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ यांची भूमिका काय?

जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधान छगन भुजबळांनी केलं होतं. त्यामुळे छगन भुजबळ हे काही मोठा निर्णय घेतात का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत तब्बल अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीत काय चर्चा झाली? काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

हे पण वाचा- Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”

अजित पवारांचं म्हणणं काय?

अजित पवारांनीही छगन भुजबळ यांचं नाव घेतलं नाही. मात्र काही लोकांना थोडं थांबायला सांगितलं तर लगेच नाराजी समोर आली असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे या दोघांमधला संघर्ष सध्या चर्चेत आहे. या संघर्षाला २००९ ची पार्श्वभूमी आहे असं बोललं जातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी हा प्रसंग काय होता ते सांगितलं आहे.

छगन भुजबळ यांचा अजित पवारांना सवाल (फोटो-अजित पवार फेसबुक पेज, छगन भुजबळ फेसबुक पेज )

काय घडलं होतं २००९ ला?

विलास लांडे म्हणाले, २००९ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला होता. त्यावेळी सर्वानुमते छगन भुजबळांची निवड झाली होती. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात तेव्हा संघर्ष नव्हता. मात्र शरद पवारांनी जो निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार नाराज झाले. मात्र पक्षश्रेष्ठींनी तेव्हा अजित पवारांची नाराजी दूर केली. त्यानंतर आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर छगन भुजबळांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी मिळून ठरवलं की आता छगन भुजबळ यांच्याऐवजी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावं. आम्ही पक्षातल्या आमदारांना एकत्र केलं. सह्यांची मोहीमही राबवली आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील, आर. आर पाटील हे इच्छुक होते या घटनेचा मी साक्षीदार आहे.

एका माणसाला किती पदं द्यायची?-विलास लांडे

छगन भुजबळ यांना हटवून अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले का? असे विचारले असता विलास लांडे यांनी सांगितलं की , सगळ्या आमदारांनी सांगितले होतं की, भुजबळ यांनी आता थांबायला हवे आणि अजित पवारांना संधी देण्यात यावी, असे विलास लांडे यांनी म्हटले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत विलास लांडेंनी हा प्रसंग सांगितला. ज्यानंतर अजित पवारांनी छगन भुजबळांना डावलण्यामागे हा प्रसंग तर नाही ना? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवारांनी छगन भुजबळांना एकही पद दिले नाही, असे विचारले असता एका माणसाला किती पदं द्यायची. त्यांच्या मुलाला विधान परिषद, त्यांचा पुतण्या माजी खासदार, ते स्वतः मंत्री झालेत. त्यांनी कुठला ओबीसी कार्यकर्ता मोठा केला? असा सवाल विलास लांडेंनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal news why ajit pawar note gave him ministery what happened in 2009 scj