Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. या मंत्रिमंडळात भाजपाचे १९ मंत्री, शिवसेना शिंदे गटाला ११ मंत्रि‍पदे आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ९ मंत्रिपदे देण्यात आले. मात्र, या मंत्रिमंडळात अनेक मोठ्या नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे महायुतीमधील काही नेते नाराज झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रिमंडळात डावलण्यात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपण मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज नसल्याचंही सांगितलं आहे. मात्र, “मला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं, त्यामुळे मी दु:खी आहे”, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते. एवढंच नाही तर जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असं सूचक विधान करत आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “…म्हणून सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेतलं नाही”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून मी नाराज नाही. अनेकवेळा अशी मंत्रि‍पदे आली आणि गेली. मी विरोधीपक्ष नेता म्हणून दखील काम केलेलं आहे. शिवसेनेचा एकटा आमदार असतानाही मी सर्वांना तोंड देण्याचं काम केलं. प्रश्न हा मंत्रि‍पदाचा नाही. ज्या पद्धतीने ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं. त्यामुळे मी दु:खी आहे. मंत्रि‍पदे येतात आणि जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना शरद पवार यांच्याबरोबरही मी होतो. तसेच अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबरही मी होतो”, असं छगन भुजबळांनी म्हटलं.

“जेव्हा ओबीसींचा लढा झाला, बीडमध्ये काही आमदारांची घरं पेटवली गेली. तेव्हा मी स्वत: बीडमध्ये गेलो आणि पाहिलं तेव्हा मी ठरवलं की मी शांत बसणार नाही. त्यानंतर मी माझा आवाज उठवला. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी मी राजीनामा दिला होता आणि अंबडला ओबीसी मेळाव्यासाठी गेलो होतो. मात्र, तेव्हा मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले आणि राजीनाम्यासंदर्भात काही बोलू नका असं सांगितलं होतं”, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

आता पुढची भूमिका काय?

“मी रोखठोक बोलतो ही माझी सवय आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे आणि अन्याय होत असेल तोपर्यंत मी संघर्ष करत राहणार आहे”, असंही ते म्हणाले. दरम्यान, आता पुढची भूमिका काय? असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच समता परिषदेशी आणि अनेक कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते मी ठरवणार आहे. मात्र, एक आहे की जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असं सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal on maharashtra cabinet expansion ncp dropped from ministerial post in mahayuti politics gkt