Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी नागपूरमध्ये पार पडला. या मंत्रिमंडळात भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळातून काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे महायुतीमधील काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे त्यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच आता आपण कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत त्यांतर पुढची भूमिका काय ते ठरवणार असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं आहे. दरम्यान, सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अधिवेशनात सहभागी होणार की नाही? असं छगन भुजबळांना विचारलं असता मी आता अधिवेशनाला जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“उद्या मी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. येवला आणि लासलगावमध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही भेटणार आहे. याबरोबरच नाशिकसह चार जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका काय ते ठरवणार आहे. कार्यकर्ते नाराज आहेत, यावर मी त्यांना काय भूमिका घ्यायची हे उद्या विचारणार आहे”, असं छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : “मी त्यांची माफी मागतो”, चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितली रामदास आठवलेंची माफी; कारण काय?

अधिवेशनात सहभागी होणार का?

महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुरु झालेलं आहे. यातच मंत्रिमंडळात तुम्हाला संधी मिळालेली नाही. मग आता तुम्ही या अधिवेशनात सहभागी होणार की नाही? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की मी आता अधिवेशनाला जाणार नाही.

पुढे काय भूमिका घेणार?

मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भुजबळ आता काय भूमिका घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात बोलताना छगन भुजबळांनी देखील सूचक विधान केलं. “मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच समता परिषदेशी आणि अनेक कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढे काय करायचं ते मी ठरवणार आहे. मात्र, एक आहे की जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी आज दुपारी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ नेमकं काय भूमिका घेतात? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader