Chhagan Bhujbal on NCP VS Shivsena : विधानसभेला महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. मात्र, विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी अद्याप सरकार का स्थापन झालं नाही? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातच महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर गृहमंत्री पद सोडण्यासं भाजपा तयार नाही. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडूनही शिंदेंच्या बरोबरीने आम्हालाही मंत्रि‍पदे देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, ‘स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर आहोत. त्यामुळे आम्हालाही त्यांच्या (शिंदेंच्या) बरोबरीने मंत्रि‍पदे द्या, एवढीच आमची मागणी आहे’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या मागणीमुळे महायुतीत मंत्रि‍पदावरून रस्सीखेच सुरु आहे का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा : रुग्णालयातून बाहेर येताच एकनाथ शिंदेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया; प्रकृतीविषयी दिली अपडेट, म्हणाले…

छगन भुजबळ काय म्हणाले?

ईव्हीएमबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “ईव्हीएममध्ये गडबड करणं हे अशक्य आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः देखील सांगितलं होतं की ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही. आता मतदानात वाढ झाली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की, ६ वाजेपर्यंत मोठी गर्दी असते. मग गेट बंद केलं जातं आणि राहिलेल्या लोकांचं मतदान घेतलं जातं. त्यानंतर मतपेट्या बंद केल्या जातात. या सर्व गोष्टींना वेळ लागतो. शेवटच्या तासांत मोठ्या प्रमाणात मतदान होतं”, असं छगन भुजबळांनी विरोधकांच्या आरोपावर उत्तर दिलं.

राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाच्या यादीबाबत काय म्हणाले?

“मंत्री पदाबाबत मला देखील अनेक लोक वेगवेगळी नावं पाठवतात. मात्र, हे सर्व अंदाज आहेत. शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो, त्याच्या आधी एक दिवस पक्षाकडून सांगितलं जातं असतं. किंवा मंत्रिमंडळाची सर्व यादी राज्यपालांकडे जाते, तेव्हा ती यादी खरी असते. मात्र, तोपर्यंत हे सर्व अंदाज असतात”, असं भुजबळांनी म्हटलं.

‘आम्हाला शिंदेंच्या बरोबरीने मंत्रिपदे द्या’

“स्ट्राईक रेटनुसार आमच्यात दोन आणि तीन नंबरमध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. मग तुम्ही आम्हाला (अजित पवारांच्या राष्ट्रवादीला) त्यांच्या (शिंदेंच्या शिवसेनेच्या) बरोबरीने मंत्रिपदे द्या, एवढी आमची मागणी आहे. यावर आता जे काय आहे ते सर्व नेते बसून निर्णय घेतील. कदाचित आम्हाला (शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) सारख्या जागा देतील किंवा एखादी जागा कमी जास्त होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal on mahayuti mantripad ncp ajit pawar vs shivsena eknath shinde mahayuti politics and maharashtra assembly election 2024 gkt