नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत महायुतीमध्ये अद्यापही पेच कायम आहे. नाशिकच्या जागेवरुन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. यातच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार आणि कोणत्या पक्षाकडे ही जागा जाणार? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे.
मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?
“जोपर्यंत अधिकृतरित्या जाहीर होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी उमेदवाराचे नाव जाहीर होईल, त्यावेळी आम्ही सगळे एकत्रित काम करणार आहोत. नाशिकची निवडणूक महाराष्ट्रातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी तेथील वाटाघाटी झाल्या आहेत. काही निवडणुका दोन दिवसांत आहेत. तसेच काहींचे दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरायचे सुरु आहे. त्यामुळे तेथील वाटाघाटी आणि निवडणुकीसाठी सगळ्यांचे लक्ष आहे”, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा : “यांना इतक्या ताकदीनं पाडा की…”, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन; देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख!
भाजपाच्या जाहीरनाम्यावर भुजबळ काय म्हणाले?
“भाजपाने जाहीरनाम्यात काही सांगितले असेल तर ते पूर्णदेखील करतील. अनेक गोष्टींची पूर्तता त्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांना सुद्धा दरवर्षी ठराविक रक्कम पीएम किसान योजेनेतून खात्यात जाते. घरांच्या योजनेसाठी १२ हजार कोटी रुपये केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिले आहेत. यानंतर राज्य सरकारनेही अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. महायुतीचा फायदा हा भारतातील जनतेला होत आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक आणि साताऱ्याची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब का?
महायुतीमधील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षामध्ये नाशिक आणि सातारा लोकसभेच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु असल्यामुळे येथील उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसरीकेडे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी ४८ मतदारसंघांचे जागा वाटप पूर्ण केले आहे. मात्र, महायुतीत अद्याप या दोन जांगावर तोडगा निघाला नसून येथील उमेदवार जाहीर करण्यास विलंब का होत आहे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नाशिकची उमेदवारी कोणाला मिळणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.