Chhagan Bhujbal on NCP VS Shivsena Strike Rate : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सत्तास्थापनेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये गेल्या जवळपास आठ दिवसांपासून हालचाली सुरु आहेत. मात्र, विधानसभेचा निकाल लागून आठवडा झाला तरीही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. मग महायुतील बहुमत मिळून देखील आतापर्यंत सरकार का स्थापन झालं नाही? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यातच महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. पण एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं बोललं जातंय. मात्र, गृहमंत्री पद सोडण्यासं भाजपा तयार नसल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर बैठकही झाली. पण तरीही यावर तोडगा निघाला नसल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. ‘स्ट्राईक रेटनुसार भाजपा एक नंबर तर आम्ही दोन नंबरवर आणि शिंदेंची शिवसेना तीन नंबरवर आहे. त्यामुळे आम्हालाही शिवसेने एवढे मंत्रिपदे मिळायला हवीत’, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; नेते म्हणाले, “परिस्थिती जटील, पक्षाचा निर्णय…”
छगन भुजबळ काय म्हणाले?
“अजित पवारांबरोबर आमची एक बैठक झाली. त्या बैठकीत आम्ही हिशेब केला. आता शिवसेना (शिंदे) पक्षाला जास्त जागा मिळाल्या त्यांनीही जास्त जागा लढवल्या, त्यामुळे त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या. त्या मानाने आम्हाला (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) जागा मिळाल्या. त्या मानाने आमचे उमेदवार निवडून आले. मात्र, आपण स्ट्राईक रेट पाहिला तर आमच्यात स्ट्राईक रेटनुसार भारतीय जनता पक्ष एक नंबरला आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष दोन नंबरवर आहे, तर शिवसेना (शिंदे) हे तीन नंबरवर आहेत”, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे.
‘आम्हाला शिंदेंच्या बरोबरीने मंत्रिपदे द्या’
“स्ट्राईक रेटनुसार आमच्यात दोन आणि तीन नंबरमध्ये थोडासा फरक आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. मग तुम्ही आम्हाला त्यांच्या बरोबरीने जागा द्या, एवढीच आमची मागणी आहे. यावर आता जे काय आहे ते सर्व नेते बसून निर्णय घेतील. कदाचित आम्हाला (शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) सारख्या जागा देतील किंवा एखादी जागा कमी जास्त होईल”, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
महायुतीत अस्वस्थता आहे का?
विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होऊन गेला पण अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळे यामागे नेमकं कारण काय आहे? की महायुतीत अस्वस्थता आहे का? असं पत्रकार परिषदेत विचारलं असता भुजबळ म्हणाले, “सरकार स्थापन होण्यासाठी वेळ लागत असला तरी अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री असले तरी काही अडचण निर्माण झालेली नाही. राज्य व्यव्यवस्थित सुरु आहे. सर्व अधिकारी देखील त्यांचं त्यांचं काम पाहत आहेत”, असं छगन भुजबळ यांनी सांगितंल.
राष्ट्रवादी नवीन चेहऱ्यांना संधी देणार का?
महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला मंत्रिमंडळात काही मंत्रिपदे मिळाल्यानंतर त्यामध्ये पक्ष काही नवीन चेहऱ्यांना संधी देणार का? असं छगन भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले, “आता काही जण दोन ते चार वेळा निवडून आलेले आहेत, पण त्यांना मंत्रिपदे मिळालेली नाहीत. मग ते देखील म्हणतात की आम्ही मंत्री कधी होणार? मग काही नवीन आणि जे दोन ते तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांना संधी दिली जाते. हे सर्व पक्षांमध्ये होतं, त्यामुळे सर्वच पक्षात जुने आणि नवीन चेहरे दिले जातात”, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.