निवडणुकीत माझा पराभव करण्याबद्दल बोललं जातं. पण, माझा पराभव करणे सोडाच, तुमच्या कित्येकांचा पराभव होईल याचा अगोदर हिशेब करा. अज्ञानात राहू नका. आम्हालाही काहीतरी कळतं. एवढे वर्ष महाराष्ट्रात राजकारण करत आहे. तुम्ही म्हणाल तसं होणार का? असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“महाराष्ट्रात ५४ टक्के ओबीसी, २० टक्के आदिवाशी आणि दलित, ब्राम्हण समाज ३ टक्के आहे. हे सगळे ७७ टक्के झाले. मग राहिले किती? अशी वाटणी झाली, तर निवडणुकीत काय होईल. त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन चला,” असं भुजबळांनी म्हटलं.

हेही वाचा : मंत्रीपदावरून हकालपट्टीची मागणी करणाऱ्या संभाजीराजेंना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मला…”

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे की, दोन महिने झालं मला धमकीचे फोन येतात. शिव्या दिल्या जातात. तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही. काय राज्य आहे?” अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “सत्तर वर्षे मराठ्यांचं झालेलं नुकसान कोण भरून काढणार?” जरांगे-पाटलांचा सरकारला सवाल; म्हणाले, “ओबीसी नेत्यांचा…”

“ठिक-ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. पण, लोकप्रतिनिधींचं मत जाणून घ्या. पटलं तर ठिक नाही पटलं, तर निवडून देऊ नका. मात्र, दोन-चार जण बॅनर लावतात. महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का? पोलिसांनी हे बॅनर तातडीने काढून टाकवेत. अन्यथा कुणीतरी आमच्यासारखं उठून काठीला-काठी भिडल्यावर तुम्ही जागे होणार का?” असा सवाल भुजबळांनी पोलिसांना विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal on obc reservation maratha reservation manoj jarange patil ssa