राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये जाहीरसभा घेतली होती. या सभेनंतर रविवारी (२७ ऑगस्ट) अजित पवार गटानेही बीड येथे उत्तरसभा घेतली. या सभेतून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. २३ डिसेंबर २००३ साली तुम्ही माझ्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. तेव्हा माझी काय चूक होती? असा सवालही भुजबळ यांनी विचारला.
दरम्यान, छगन भुजबळ यांचं भाषण सुरू असताना सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार आरडाओरड केली. यानंतर छगन भुजबळांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं. पण ही आरडाओरड आणि गोंधळ नेमका कशामुळे झाला? याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. काहींच्या मते नेत्यांची भाषणं लांबल्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तर काहींच्या मते शरद पवारांवर टीका केल्याने ही आरडाओरड झाल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा >> “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल
याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्र सोडलं. ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत, अशी टीका आव्हाडांनी केली. यावेळी आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये #Armstrong असा हॅशटॅगही वापरला आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “बीडकरांना सलाम! शरदचंद्र पवारसाहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती. त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा… ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत. #Armstrong”
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
“पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. तुम्ही आणि मी महाराष्ट्रात दोघेच फिरत होतो. थोडे आमदार कमी पडले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री, तर मी उपमुख्यमंत्री झालो. पण, मला एक कळलं नाही. २३ डिसेंबर २००३ साली माझा गृहमंत्रीपदाचा राजीनामा तुम्ही घेतला. माझी काय चूक होती?तेलगीला अटक करत त्याच्यावर मोक्का लावण्याचे आदेश मी दिले. तेव्हा तुम्ही मला बोलावलं आणि राजीनामा देण्यास सांगितलं. झी टीव्हीच्या तिकडे दगडफेक झाली आहे. राजीनामा द्या, असं तुम्ही म्हटलं. नंतर फोन आला भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. तरीही तुम्ही माझा राजीनामा घेतला. १९९२-९३ आणि ९४ साली खैरनार यांनी तुमच्यावरही आरोप केले होते. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही. मग माझा राजीनामा का घेतला?” असा संतप्त प्रश्न भुजबळांनी शरद पवारांना विचारला आहे.