Chhagan Bhujbal On Udayanraje Bhosale : भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महात्मा फुले यांच्या कार्याबाबत भाष्य केलं. मात्र, यावेळी उदयनराजे भोसले यांनी एक विधान केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा, सर्व धर्म समभावाचा विचार महात्मा फुले यानी लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी मुलींची शाळा सुरु करत असताना एकप्रकारे थोरले प्रतापसिंह यांचे अनुकरण केले”, असं विधान उदयनराजे भोसले यांनी केलं.

उदयनराजे भोसले यांच्या या विधानावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या संदर्भात भाष्य करत उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील उदयनराजे भोसले यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करताना कोणाची प्रेरणा घेतली? यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य करत उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मी जे काही वाचलं त्यामध्ये महात्मा फुले यांनी थॉमस पेन आणि इतर जे जगातील तत्त्वज्ञ आहेत त्यांची पुस्तक वाचून त्यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा घेतली. हा एक मुद्दा. आता खासदार उदयनराजे भोसले या संदर्भात बोलले. पण आता उदयनराजे ओ राजा है हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेगे?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “पूर्वीचे राजे, राजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच शिक्षणाची व्यवस्था करत होते. राजघराण्यातील मुलासांठी ते शिक्षणाची व्यवस्था राजवाड्यातच करायचे. सार्वजनिक रित्या नाही. १ जानेवारी १८४८ साली महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

महात्मा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं की, “महात्मा फुले चांगले उद्योजक, अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती गोळा केली, ती सर्व समाज सुधारण्याच्या कामाकरिता खर्च केली. महात्मा फुले यांनी एकप्रकारे थोरले प्रतापसिंह यांचे अनुकरण केले होते. सर्वात आधी स्त्री शिक्षणासाठी शाळा कुणी सुरू केली असेल तर ती थोरल्या प्रतापसिंहांनी सातारच्या राजवाड्यात केली होती”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.