Chhagan Bhujbal On Uddhav Thackeray and Raj Thackeray : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना ठाकरे गटाबरोबर युती करण्याबाबत सूचक भाष्य केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांच्या विधानाला उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेच्या युतीबाबतराज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत भूमिका मांडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात नक्कीच शिवसेनेची (ठाकरे) ताकद वाढेल, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर छगन भुजबळ यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले की, “माझ्यासारखा जुना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करणारा नेता म्हणून जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मला खूप आनंद होईल. दरम्यान, जेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतून बाजूला जाणार होते हे मला कळलं होतं तेव्हा मी स्वत:हून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तेव्हा त्यांना म्हटलं होतं की एक ८ दिवस शांत राहा. कदाचित तुमच्या मनातला राग कमी होईल. तुम्ही परत एकदा विचार करा. तेव्हा काही दिवस ते शांत राहिले. पण दुर्देवाने जे व्हायचं ते झालं आणि ते दोन्ही वेगळे झाले”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

“आज देखील दोन्ही ठाकरे एकत्र आले तर माझ्या सारखा आनंद दुसरा कोणाला होणार नाही. माझा पक्ष वेगळा आहे, आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडलेलो असलो तरी शिवसेनेबाबतचं आमचं प्रेम कमी झालेलं नाही. मी काल म्हणालो होतो की जर सर्वच कुटुंब एकत्र आले तर फार बरं होईल. मग आपआपलं राजकारण करत राहा”, अशी सूचक प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

‘…तर शिवसेनेची शक्ती वाढेल’

“जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच शिवसेनेची शक्ती वाढेल. समजा एखाद्या वार्डात दोन कार्यकर्ते आम्हाला मिळाले तरी आम्हाला वाटतं की त्या वार्डात आपली शक्ती वाढली. आता हे दोन्ही ठाकरे हे वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत. मग हे ठाकरे एकत्र आले तर शक्ती वाढणार नाही का?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.