Chhagan Bhujbal NCP Party Workers Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने ते नाराज आहेत. तशा भावनाही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. पक्षाने अवहेलना केली असल्याचं वक्तव्य देखील भुजबळांनी मंगळवारी (१७ डिसेंबर) नाशिक येथे केलं. आता भुजबळ अवहेलना सहन करत आपलं काम करत राहणार की वेगळी भूमिका घेणार असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. दरम्यान, भुजबळांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की मी माझ्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, मतदारसंघातील जनतेशी व समता परिषदेच्या लोकांशी बोलून पुढचे निर्णय घेईन. त्यानुसार भुजबळ यांनी बुधवारी या सर्व मंडळींची भेट घेतली. त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेनंतर भुजबळांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपण आता आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष केंद्रीत करायचं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मार्गदर्शन करताना भुजबळ म्हणाले, आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत. त्यामुळे आपण पुन्हा लढू, हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर अस्मितेचा आहे, अशा भावना व्यक्त केल्या. आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून आपण काम करत आहोत. त्यामुळे हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही. आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी एकसंध राहून काम करावे. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली. त्याबद्दल आभार मानले. मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे. मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे. तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून विकासाची कामे अविरतपणे सुरू राहतील. येवला-लासलगाव मतदारसंघ आपल्याला एकसंध ठेवायचा आहे. आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील”.

हे ही वाचा >> “तू राहशील किंवा मी”, फडणवीसांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन; राऊत म्हणाले, “तोफा थंडावल्या”

नाशिकमध्ये भुजबळांची पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा

यावेळी पदाधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्यासोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे, विश्वासबापू आहेर, डी.के.जगताप, अरुणमामा थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, किसनकाका धनगे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal party workers meet in nashi yeola after dropped from ministry asc