देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडलेल्या संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलंय. राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. यावेळेस त्यांनी मोदींनी अजित पवारांना भाषण करण्यास सांगितल्याबद्दल कौतुकही केलंय.
नक्की वाचा >> पंतप्रधान मोदींसमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना दिली ‘एक्स्चेंज ऑफर’; म्हणाले, “फार मोठं आणि…”
देहूमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.
नक्की वाचा >> “मुख्यमंत्री म्हणतील, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती मग जिंकायची गरज काय? आजपासून…”; शरद पवारांच्या उमेदवारीवरुन खोचक टोला
सुत्रसंचालकाने थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे हात करत तुम्ही बोला असं सांगितलं. मात्र अजित पवार यांनी आपण बोलावं अशी भूमिका घेत मोदींकडे पाहून भाषणासाठीच्या पोडियमकडे हात केला. या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे असं म्हटलंय. आता याच संदर्भात भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
“देहू येथील कार्यक्रमाला राज्याच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते यांना बोलायला संधी देता आणि राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री यांचे बोलण्याच्या यादीत नाव नाही हे चुकीचेच आहे,” असं भुजबळ म्हणालेत. तसेच पुढे बोलताना भुजबळ यांनी मोदींनी अजित पवारांना भाषणासाठी विचारल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. “पंतप्रधानांनी अजित पवारांना विचारले तो त्यांचा मोठेपणा आहे. मात्र अजित पवार यांना माहीत होते की, यादीत आपलं नावच नाही तर ते बोलतील कसे?,” असा उलट प्रश्न छगन भुजबळांनी या प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केला.