शुल्क न भरल्याच्या कारणावरून १४ विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून देणाऱ्या सिल्व्हर ओक शाळेविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास कित्येक दिवस दिरंगाई करणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ मनसेचे आ. नितीन भोसले यांनी शनिवारी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर अखेर सायंकाळी यंत्रणेने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मनमानी करणाऱ्या येथील सिल्व्हर ओक शाळेच्या प्रशासनाविरुद्ध आजतागायत गुन्हे दाखल न करण्यामागे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पोलीस यंत्रणेवर असणारा दबाव कारणीभूत असल्याचा आरोप आ. भोसले यांनी केला.
सिल्व्हर ओक व्यवस्थापनाने १४ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले होते. या प्रकाराची चौकशी करण्यास गेलेल्या महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना प्राचार्यानी हुसकावून लावले. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. दरम्यानच्या काळात शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाविरोधात स्वतंत्रपणे तक्रार दिली.
शिक्षण उपसंचालक शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्र दिले. या सर्व घडामोडींना २२ दिवस उलटूनही पोलीस शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी आ. नितीन भोसले यांनी आंदोलन सुरू केले. या प्रकरणात पोलिसांची भूमिका शाळेला वाचविण्याची असल्याची तक्रारही त्यांनी केली.
शाळेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन महाजन यांचा समावेश आहे. यामुळे पालकमंत्री शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भोसले यांनी केला. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हे दाखल न झाल्यास सोमवारी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे दाद मागितली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. या घडामोडीनंतर सायंकाळी पोलीस यंत्रणेने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी दिली.