जालना / छत्रपती संभाजीनगर / बीड : मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देणे म्हणजे मागील दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्यासारखे आहे, अशी टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी लक्ष्य केलेल्या आमदारांच्या घरांची त्यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी आपल्याच सरकारच्या अनेक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी फाटय़ाजवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना  भुजबळ यांनी सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजास आरक्षण देण्यास विरोध असल्याचे स्पष्ट केले. निजामकालीन कुणबी नोंदी असलेल्यांना आरक्षण द्यायला हरकत असेही ते म्हणाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे भुजबळांनी सरकारच्या धोरणांवरच तोफ डागली. तेलंगणामध्ये निवडणूक सुरू असताना दोन दिवसांत कुणबी असल्याचे पुरावे कसे मिळतात, असा प्रश्न त्यांनी केला. ज्या जालना जिल्ह्यातून शरद पवारांनी ओबीसी आरक्षणाची घोषणा केली तेथूनच आरक्षण संपवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा >>> छगन भुजबळांमागे मास्टरमाइंड कोण? मनोज जरांगेंचं हटके उत्तर; म्हणाले, “हे लफडं…”

बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, की सोळंकेंच्या घराची जाळपोळ पाहून आपण बीडच्या पोलीस अधीक्षकांशी बोललो आणि त्यांना राऊत यांच्या हॉटेलला बंदोबस्त देण्याच्या सूचना केल्या. मात्र, बीडचे पोलीस गाफील राहिले. समाजकंटकांनी हिंसाचार करायचा आणि सरकारने गुन्हे मागे घ्यायचे यावर नक्कीच विचार करावा लागेल, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. घटनेच्या मुळाशी गेले पाहिजे, त्यामागे नेमके कोण होते याचा शोध घेऊन शिक्षा व्हायला पाहिजे, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

‘गुन्हे मागे घेऊ नका’

बीड जिल्ह्यात मराठा नेत्यांच्या घरांवरील हल्ले पूर्वनियोजित असून, त्याची गुप्तचर विभागाला माहिती कशी नव्हती, अशी शंका भुजबळ यांनी उपस्थित केली. कुणाला जिवे मारायचे होते का? राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी व गुन्हे मागे घेऊन नयेत, अशी मागणी त्यांनी केली. आंतरवाली सराटी येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचीही चौकशी केली जावी, असेही भुजबळ या वेळी म्हणाले.

भुजबळ काय म्हणाले?

* सरकारने कुणबी प्रमाणपत्रांचे दुकान मांडले आहे.

* ओबीसींनी अन्यायाविरोधात एकत्रित आले पाहिजे.

* नेत्यांच्या घरांवरील हल्ले पूर्वनियोजित होते.

* राज्य सरकारने गुन्हे मागे घेऊ नयेत. * १७ नोव्हेंबर रोजी जालन्यातील अंबडच्या ओबीसी महामोर्चात सहभागी व्हा.

Story img Loader