निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दुख: झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच चिन्ह गोठवलं असले तरी शिवसेनेची नवीन निशाणी जनतेपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

“चिन्हाचा निर्णय एकवेळ ठिक आहे. मात्र, निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव वापरायचं नाही, असा जो निर्णय दिला आहे. ते ऐकून मला वाईट वाटलं. मी अनेक निवडणुका शिवसेना या नावावर लढवल्या आहेत. हे नाव आज राज्यातील खेडोपाड्यात, अनेकांच्या मनात पोहोचलं आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी हे नाव दिले होते. ते नाव जर संपवण्यात येत असेल तर त्याचे मला दुख होते आहे”, अशी प्रतक्रिया राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हेही वाचा – शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“मागे वळून बघितलं, तर अनेकदा काँग्रेसचे चिन्हही बदलले आहेत. किंबहूना शिवसेनेत असताना मी सुद्धा काही निवडणुका ढाल-तलवार या चिन्हावर लढवल्या आहेत. आमदार म्हणून मी निवडून आलो, तेव्हा शिवसेनेची निशाणी मशाल होती. मला हे मान्य आहे की, निशाणी लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. मात्र, आता सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम अत्याधुनिक झाली आहेत. आता दोन मिनिटांत इथून लंडनपर्यंत निशाणी पोहोचू शकते”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “संहितेमध्ये मुख्य नेता असं पदच नाहीये, मग..”, शिवसेनेनं ‘या’ मुद्द्यावर ठेवलं बोट; एकनाथ शिंदेंवर टीकास्र!

दरम्यान, निवडणूक आयोगाने काल ‘धनुष्यबाण’ चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही नवी निशाणी देण्यात येणार आहे. याबरोबच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असेही आयोगाकडून सांगण्यात आले आहे.