काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडली आहे. फूट पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते आमने-सामने आल्याचे दिसले. पण त्यानंतर काही दिवसांत दोन्ही गटातील नेत्यांमधील विरोध मावळल्याचं चित्र आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. शिवाय अजित पवार गटाच्या नेत्यांच्या बॅनरवरही शरद पवारांचा फोटो सर्रास वापरला जात आहे.
फोटो वापरला जात असल्याने शरद पवार यांनी अलीकडेच अजित पवार गटाला इशारा दिला आहे. बॅनर आणि इतर ठिकाणी माझा फोटो वापरल्यास मी न्यायालयात जाईन, असा इशारा शरद पवारांनी दिली. शरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. कुणीतरी आदराने फोटो लावला म्हणून कोर्टात गेलेलं कुणाला आजपर्यंत पाहिलं नाही, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
फोटो वापरण्यावरून शरद पवारांनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “बॅनरवर शरद पवारांचा फोटो वापरल्यास ते कोर्टात जाणार आहेत, असं वाचलं. पण सुरुवातीच्या काळात शरद पवार स्वत: म्हणाले होते की, मी कोर्टबाजी करणार नाही. आता फोटोवरून ते कोर्टात जाणार असं म्हणाले. पण फोटोची विटंबना झाली म्हणून कोर्टात गेलेली अनेक उदाहरणं आहेत. परंतु कुणीतरी आदराने आपला फोटो लावला, म्हणून कुणी कोर्टात गेलंय, असं उदाहरण मी पाहिलेलं नाही.”