Chhagan Bhujbal Remark on Sameer Bhujbal Political Rumours : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्याबद्दल गेल्या दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय चर्चा ऐकायला मिळत आहेत. समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. ते शिवसेना (ठाकरे) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (शरद पवार) आगामी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार असल्याचं बोललं जात आहे. ते नांदगाव मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशा शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यावर आता समीर भुजबळांचे काका, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) वरिष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “या केवळ प्रसारमाध्यमांनी पसरवलेल्या बातम्या आहेत. यात काही तथ्य नाही”.

छगन भुजबळ म्हणाले, “तुम्ही प्रसारमाध्यमं अशा बातम्या देत आहात, कदाचित तुम्हालाच जास्त माहिती असेल. समीर भुजबळ हे माझ्याबरोबर आहेत, अजित पवारांबरोबरच आहेत. आता येवला मतदारसंघात काम करणार आहेत. तुम्ही (माध्यमं) सल्ला देणाऱ्या बातम्या देत आहात का? तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात तसं काही आहे का? समीर भुजबळ यांनी मविआकडे जावं असं तुम्हाला वाटतं का? कारण मला या बातम्या समजल्या नाहीत. त्या कशासाठी पसरवल्या जात आहेत ते देखील समजलं नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे या बातम्यांचा मूळ आधार काय आहे, ते देखील मी समजू शकलो नाही.

हे ही वाचा >> गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरून सुप्रिया सुळेंचं एकनाथ शिंदेंवर टीकास्र; म्हणाल्या, “मावळते मुख्यमंत्री अन् त्यांचा पक्ष…”

छगन भुजबळ मनोज जरांगेंविषयी काय म्हणाले?

यावेळी भुजबळांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी देखील भाष्य केलं. जरांगे पाटलांचे कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यावर भुजबळ म्हणाले, “आपल्या देशात लोकशाही आहे, ते (मनोज जरांगे) जी भूमिका घेतील ते घेतील, मला तर असं वाटतं की त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजेत. लोकशाहीमध्ये सर्वांनाच अधिकार आहेत. राज्यात असे कितीतरी पक्ष निर्माण झाले आहेत. मनोज जरांगेंनी सुद्धा नशीब आजमावलं तर हरकत नाही”.

हे ही वाचा >> Gayatri Shingne: ‘पवार साहेब, हेच का आमच्या निष्ठेचं फळ’, काकाच्या पक्षप्रवेशानंतर पुतणीचा अपक्ष लढण्याचा निर्धार; शरद पवार काय करणार?

महायुतीची उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार?

छगन भुजबळांना यावेळी विचारण्यात आलं की महायुतीची विधानसभा उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? त्यावर भुजबळ म्हणाले, “उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडी व महायुतीत काही जागांवर घासाघीस चालू राहील. अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र शेवटच्या दिवसात तो अर्ज परत घेतील. त्यानंतर खरी निवडणुकीची लढाई सुरू होईल.