मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यास छगन भुजबळांसह राज्यातील इतर ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यातल्या आंबड येथे ओबीसी एल्गार सभा घेतली. या सभेत केलेल्या भाषणात भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली. भुजबळ हे मनोज जरांगे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर वैयक्तिक टीकादेखील करू लागले आहेत.
ओबीसी एल्गार सभेतील छगन भुजबळांच्या भाषणावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती.
रोहित पवार यांच्या टीकेला छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी भुजबळ म्हणाले, मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी शरद पवार स्क्रिप्ट देत नव्हते, ना अजित पवार, ना फडणवीस, ना एकनाथ शिंदे, मला कोणीच स्क्रिप्ट देत नाही. गेल्या ३५ वर्षांपासून मी हे काम करत आहे. मी ओबीसींचं काम हाती घेतलं आहे आणि हेच माझं स्क्रिप्ट आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हेच माझं स्क्रिप्ट आहे. मंडल आयोगाचा अहवाल हे माझं स्क्रिप्ट आहे. बहुजन समाज, ओबीसी समाजाचं स्क्रिप्ट तेच माझं स्क्रिप्ट.
हे ही वाचा >> “भारतीय जुगार पार्टी म्हणजे भाजपा, कारण..”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
आक्रमक भाषा वापरण्यासाठी भुजबळांना धमकी?
शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनीदेखील भुजबळांच्या आंबडमधील भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव म्हणाले, आंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी आक्रमक भाषा वापरायची गरज नव्हती. अशा पद्धतीने वक्तव्य करण्यासाठी भुजबळांना कुणीतरी धमकी दिल्याचं दिसत आहे. पण दोन्ही समाजातील लोकांनी संयम ठेवावा, अशी माझी विनंती आहे,