राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आतापर्यंत महापौर ते उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं भुषवली. या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. धडाडीचा नेता म्हणूनत त्यांची ओळख आहे. आपल्या या राजकीय कारकिर्दीत त्यांनी लाखो श्रोत्यांची उपस्थिती असलेल्या सभा घेतल्या. मात्र छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने अनेकवेळा हुलकावणी दिली. त्यांना या पदापर्यंत का पोहोचता आलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. दरम्यान, भुजबळ यांनी यावर भाष्य केले आहे. आतापर्यंत मुख्यमंत्रीपद का मिळाले नाही, याचं कारण छगन भुजबळ यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’ने त्यांची एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा >>> राज्यातील माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन! शिंदे गटातील मंत्र्याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक

मला मुख्यमंत्रीपदाने अनेकवेळा हुलकावणी दिली. भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर मी त्यांना मुख्यमंत्री केलं असतं, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होता. तेव्हादेखील ऐनवेळी काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला. तेव्हा मला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळायची. पण मी शरद पवार यांच्यासोबत राहायचं ठरवलं होतं. तेव्हा काँग्रेस फुटली नसती तर मी निश्चित मुख्यमंत्री झालो असतो, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा >> मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, पण मुंबई महापौरपदाच्या कारकिर्दीवर विशेष प्रेम; छगन भुजबळांनी सांगितलं कारण, म्हणाले…

मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्याची खंत माझ्या मनात नाही, असेही छगन भुजबळ यांनी पुढे स्पष्ट केले. “मुख्यमंत्रीपद मिळा नसल्याचं मला काहीही दु:ख नाही. आतापर्यंत किती मुख्यमंत्री झाले? यामध्ये किती लोकांना लोकमान्यता मिळाली? देशात किती मुख्यमंत्र्यांनी लाखा-लाखाच्या सभा घेतल्या? मी त्या घेतल्या आहेत. दिल्लीतील रामलीला मैदान, पटणा, जयपूर येथे मैदानं भरवली होती. अनेक लोक ७५ वर्षांची होतात. पण तुम्ही मला बोलवलं आहे. म्हणजे माझ्याकडे काहीतरी असेलंच की. हाच आनंद मोठा आहे. मी जर मोठ्या पदावर असतो, तर माझ्या आजूबाजूला लोक असती. ते लोक खुर्चीला चिकटलेले असतात,” असे छगन भुजबळ यांनी सांगितले.