राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, भुजबळ यांनी आज (३ फेब्रुवारी) अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात दंड थोपटले, तसेच राजीनाम्याच्या मागणीवर उत्तर दिलं.
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर छगन भुजबळ यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. या विरोधानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच “त्यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढा”, असं वक्तव्य केलं आहे. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नाहीत तर मग राजीनामा द्या. सरकारमध्ये का राहता? सरकारवर टीका करता आणि त्याच सरकारमध्ये कसे काय राहता? हिंमत असेल तर राजीनामा द्या. काल कोणीतरी बोललं या भुजबळला लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला बाहेर हाकला. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की मी आधीच राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा >> “मराठा आणि ओबीसी समाजांत भेदभाव…”, भुजबळांचा फडणवीसांना इशारा; म्हणाले, “तुमचा गृहविभाग…”
छगन भुजबळ म्हणाले, आंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी आधी राजीनामा दिला आणि मगच आंबडच्या सभेसाठी रवाना झालो. त्यामुळे मला लाथा घालायची गरज नाही. मी आधीच राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन मी अडीच महिने शांत राहिलो. कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला म्हणाले की याची कुठेही वाच्यता करू नका. परंतु, वर्तमानपत्रात बातमी आली, कोणी म्हणालं राजीनामा द्या, कोणी म्हणतं दिला, कोणी म्हणतं नाही दिला. कोणी म्हणतं भुजबळला लाथा घाला. मी त्या सर्वांना सांगेन की, मला लाथा घालायची काहीही गरज नाही. मी राजीनामा दिला आहे. कारण मी शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार आहे