नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठं अपयश पाहावं लागलं. या अपयशाची अनेक कारणं आहेत. महायुतीतल्या काही नेत्यांमध्ये पुरेसा ताळमेळ नसणं आणि जागावाटपाला झालेला उशीर ही देखील त्यांच्या अपयशाची कारणं आहेत. नाशिक लोकसभेच्या जागेवरील उमेदवारी जाहीर करायला महायुतीने अनेक दिवस घेतले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) वरिष्ठ नेते छगन भुजबळ प्रयत्न करत होते. त्यांनी त्यांची इच्छा माध्यमं आणि महायुतीतील नेत्यांपुढे व्यक्त केली होती. या जागेवरून महायुतीतल्या नेत्यांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर महायुतीत ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेच्या शिंदे गटाने माजी खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (महाविकास आघाडी) उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा १.६२ लाख मतांनी पराभव केला. वाजे यांना ६.१६ लाख तर गोडसे यांना ४.५४ लाख मतं मिळाली. दरम्यान, नाशिकमधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (१४ जून) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांची परखड भूमिका मांडली.

छगन भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ लागल्या होत्या, सगळ्या जगाची नावं जाहीर झाली तरी महायुतीत चर्चा चालू होती. माझ्या मनाला दुःख झालं. मला ते अपमानास्पद वाटलं, इंग्रजीमध्ये ह्युमिलिएशन (अपमान) शब्द आहे, तशीच स्थिती होती. असं वाटणं स्वाभाविक आहे.

हे ही वाचा >> शरद पवारांचं बोट पुन्हा धरणार का? छगन भुजबळांचं उत्तर, “मी…”

यावर भुजबळ यांना विचारण्यात आलं की, तुमचा अपमान कोणी केला? यावर भुजबळ म्हणाले, ज्यांनी केला तो केला… त्यांच्या काही अडचणी असतील… किंवा तसं काही असू शकतं. परंतु, कोणी बोलून दाखवलेलं नाही. कोणी म्हटलं नाही की भुजबळांना उभं केलं तर अमुक होईल, तमुक होईल. छगन भुजबळ हे अजित पवार गटाचे उमेदवार नसणार, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. ते युतीचे उमेदवार असतील तर मराठा समाजाची मतं इतरत्र जातील किंवा युतीविरोधात जातील, असा काहीतरी प्रचार कोणीतरी केला असेल, किंवा कोणीतरी समज करून घेतला असेल. मला याबाबत अधिकृत माहिती नाही. परंतु, मी जे काही ऐकतोय त्यावरून मला असं वाटतंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal says he felt humiliated nashik lok sabha candidacy ncp bjp asc