Chhgan Bhujbal on Uddhav Thackeray Latest Political News : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. कारण त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तसेच पक्षातील काही नेत्यांवर जाहीरपणे टीका देखील केली आहे. भुजबळ वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात दाखल झाले आहेत. दुपारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना पत्रकारांनी थेट विचारलं की छगन भुजबळ त्यांच्या पक्षावर व महायुतीवर नाराज आहेत, वेगळी राजकीय भूमिका घेत तुमच्याकडे परत आले तर तुम्ही त्यांचं स्वागत कराल का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “ते काही बोलले तर मी त्यावर उत्तर देईन, आपण कशाला त्यावर काही बोलावं”.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटलं. अशा अनेक जणांबद्दल मला आतून वाईट वाटतंय. हे लोक एका अपेक्षेने तिकडे गेले होते. काही जणांना घट्ट झालेली जाकेटं आतातरी घालयला मिळाली. अशी बऱ्याचं जणांची जॅकेटं वाट बघत असतील अशा सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो”.
हे ही वाचा >> “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली
दरम्यान, “माझं भुजबळांशी नेहमी बोलणं होतं असतं. ते बऱ्याचदा माझ्याशी बोलतात”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यानंतर नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट भुजबळांना उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “होय, मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, संपर्कात असतो. मी शरद पवार यांच्याबरोबर देखील बोलत असतो. १२ डिसेंबरला मी त्यांची भेट घेतली होती. मी सुप्रिया सुळेंच्याही संपर्कात असतो. त्यांना मेसेज करतो, शुभेच्छा पाठवतो. त्या देखील त्यावर प्रतिक्रिया देत असतात. मी या सगळ्यांशी बोलतो, मग काय झालं? आपण ज्यांच्याबरोबर काम केलंय त्यांच्या संपर्कात असतो. विशिष्ट प्रसंगी एकमेकांना शुभेच्छांची देवाणघेवाण होत असते”.
हे ही वाचा >> “…तेव्हा यांनी कच खाल्ली”, भुजबळांचा राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीला टोला; लोकसभेतली खदखद अखेर बाहेर पडली
छगन भुजबळ पक्षावर नाराज
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान दिलेलं नाही. यानंतर छगन भुजबळ यांच्यासह समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नाराज छगन भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले होते, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”.