Chhagan Bhujbal on NCP Ajit Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुतीच्या नव्या सरकारमध्ये स्थान दिलेलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ सरकारवर व त्यांच्या पक्षातील वरिष्ठांवर नाराज आहेत. भुजबळांनी त्यांची नाराजी प्रसारमाध्यमांसमोर उघड केली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळातून वगळण्यापूर्वी त्यांना वरिष्ठांनी राज्यसभेची ऑफर दिली होती. मात्र भुजबळांनी ती ऑफर धुडकावली आहे. भुजबळ म्हणाले, “मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते (अजित पवार आणि इतर) मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मात्र, मी राज्यसभेवर जाण्यास, आमदारकीचा राजीनामा देण्यास नकार दिला”.
छगन भुजबळ म्हणाले, “जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा त्यांनी मला ती संधी दिली नाही. तेव्हा ते मला म्हणाले, विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार नाही. तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. त्यामुळे तुम्ही लढलंच पाहिजे, असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या त्या सल्ल्यानंतर मी विधानसभा निवडणूक लढवली. येवल्यातील जनतेने मला मोठा आशीर्वाद देत निवडून दिलं. आता मी त्यांच्या सांगण्यावरून आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही. तसं केल्यास माझ्या मतदारसंघातील जनतेची प्रतारणा होईल”.
हे ही वाचा >> “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य; तर्कवितर्कांना उधाण
ओबीसींसाठी मी उभारलेल्या लढ्याचा निवडणुकीत महायुतीला फायदा झाला : भुजबळ
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील ज्येष्ठ नेते भुजबळ म्हणाले, “मला मंत्रिमंडळातून डावललं जाईल असं वाटत नव्हतं. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील ओबीसींसाठी, मागासवर्गीयांसाठी मी उभा राहिलो. ओबीसींचं आंदोलन उभं करण्याआधी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला होता. मी ओबीसींसाठी बोलत राहणार, चुकीचं आहे त्याविरोधात बोलत राहणार असं वरिष्ठांना कळवलं होतं. त्यावर मला वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही राजीनाम्याबाबत कुठेही वाच्यता करू नका. त्या काळात दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत होते. मात्र मी ओबीसींची बाजू लावून धरली. आमच्या भूमिका ठामपणे मांडल्या. त्याचा महायुतीला निवडणुकीत फायदा झाला. लाडकी बहीण योजनेचाही फायदा झालाच. मात्र ओबीसींनी देखील महायुतीला भरभरून मतदान केलं.
हे ही वाचा >> कुठल्या दालनात कोणते मंत्री बसणार? अधिवेशनापूर्वीच झालं शिक्कामोर्तब, अजित पवारांना…
अन् भुजबळांनी पक्षाची ऑफर नाकारली
ज्येष्ठ नेते भुजबळ म्हणाले, “आठ दिवसांपूर्वी पक्षाने दिलेली ऑफर मी नाकारली. मी त्यांना सांगितलं की राज्यसभेवर जाण्यासाठी मी आमदाराकीचा राजीनामा देऊ शकत नाही. माझ्या येवल्यातील जनतेची प्रतारणा करू शकत नाही. एक दोन वर्षांनी त्यावर विचार करू”.