ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही मागणी घेऊन पुणे आणि जालन्यात काही ओबीसी कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. जालन्यात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके आणि वाघमारे यांची शुक्रवारी (२१ जून) भेट घेतली. या भेटीनंतर ओबीसी नेत्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलं. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व ओबीसी नेत्यांना, लक्ष्मण हाके यांच्या सहकाऱ्यांना आश्वस्त करत म्हणाले की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेनंतर ओबीसींच्या शिष्टमंडळाचे प्रमुख तसेच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आता जालना आणि पुणे येथे चालू असलेल्या उपोषणांच्या ठिकाणी जाऊन आंदोलकांना भेटणार आहेत. तसेच आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहेत. तत्पूर्वी भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, “काल आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.आमच्याबरोबर इतर ओबीसी नेते, आंदोलकांचे काही प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत आम्ही ओबीसींच्या बाजूने काही मागण्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यापैकी बहुसंख्य मागण्या मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी मंजूर केल्या. तर उर्वरित काही मागण्या या विधानसभेच्या अधिवेशन काळात मंजूर केल्या जातील. त्या काळात ताबडतोब बैठका घेतल्या जातील आणि सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून निर्णय घेतले जातील.”

भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत एक गोष्ट स्पष्ट केली की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि हीच राज्य सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांचा हा निरोप घेऊन मी आता लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि इतर उपोषणकर्त्यांना भेटणार आहे. त्या दोघांची प्रकृती ढासळते आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती करणार आहे की पुढच्या चर्चेत तुम्ही देखील सहभागी व्हा. आपण चर्चेतून सर्व प्रश्न मार्गी लावू. त्यामुळे तुम्ही आत्मक्लेष न करता हे उपोषण सोडावं.”

हे ही वाचा >> राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणावरून संघर्ष, संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका; म्हणाले…

छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची भाषा केली होती. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, “माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे केवळ जनता जनार्दनाच्या हातात आहे. ते कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात नाही. मनोज जरांगेंच्या हातात तर नाहीच. तो कोण आहे? मुळात कावळ्याच्या शापाने गायी मारतात का? त्यामुळे तुम्ही प्रसारमाध्यमं कशाला या गोष्टींचा विचार करताय?”