मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत एखादं पद द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या मेळाव्यात सर्व पक्षश्रेष्ठींसमोर त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. अजित पवाराचं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर असल्याचं बोललं जात आहे. अशातच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेते पद यापैकी एका पदावर इतर मागासवर्ग समाजातील (ओबीसी) नेत्याला संधी देऊन भाजपा आणि काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जातीचं समीकरण साधावं, अशी भूमिका राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवारांपाठोपाठ छगन भुजबळ यांच्या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधला गुंता अधिकच वाढला आहे. अजित पवारांना प्रदेशाध्यक्षपद दिलं तर एखाद्या ओबीसी नेत्याला ते मिळावं यासाठी भुजबळ प्रयत्न करू शकतात. तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही या पदासाठी अग्रही असतील असं म्हटलं जात आहे. अशातच छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्याला संधी द्यावी, अशी मागणी करून राष्ट्रवादीतील पदांच्या रचनेला वेगळेच वळण दिलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोरील गुंता वाढल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी गुरुवारी (२३ जून) जी भूमिका मांडली त्यावर आज पुन्हा एकदा भाष्य केलं. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना छगन भुजबळ म्हणाले, अजूनही आपल्या या देशात समजा-समाजांचं राजकारण चालत आहे. यामध्ये ओबीसी समाज असेल, दलित समाज असेल अथवा मुस्लीम समाज असेल, या सर्व समाजांना तुम्ही बरोबर घेतलं पाहिजे. तरंच आपण पुढे जाऊ शकतो. मराठा तर आमचा मोठा भाऊ आहे. ठिक आहे तुम्ही मराठी समाजाला एक पद दिलं आहे तर दुसरं एखादं पद लहान समाजातील नेत्याला द्या, माझं त्यावर दुसरं काहीही म्हणणं नाही. आम्ही आपल्याबरोबर आहोतच, आम्ही पक्षाचा प्रचार करू.

हे ही वाचा >> “आजच चमत्कार…”, विरोधकांच्या बैठकीआधी संजय राऊतांचं वक्तव्य, म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीआधी…”

छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला एक मोठं पद दिल्यावर दुसऱ्या एखाद्या लहान समाजाला दुसरं पद द्यायला हवं. कारण आपली प्रतीमा थोडीशी बदलायला हवी, अशी माझी अपेक्षा आहे. अर्थात पवार साहेब आणि इतर सगळ्या नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. जशी अजितदादांनी इच्छा व्यक्त केली तसं मी माझं मत माडलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal says ncp image should be changed asc
Show comments