गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, विशेषत: मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणवार झालेल्या पावसानं हाहाकार उडवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं आहे. या शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचा विश्वास देखील शेतकऱ्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिस्थिती बोलून दाखवली.
महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था अर्थात ‘मित्रा’च्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती.
बिचारे मुख्यमंत्री…
यावेळी बोलताना छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंचा केलेला ‘बिचारे मुख्यमंत्री’ उल्लेख ऐकून अनेकांच्या भुवया काही क्षण उंचावल्या. मात्र, भुजबळ नेमके कोणत्या संदर्भात हे म्हणाले, हे स्पष्ट होताच उपस्थितांनी देखील त्याला सहमती दर्शवली. “ग्लोबल वॉर्मिंग वगैरे मुळे जिथे पाऊस पडायला हवा तिथे पडत नाही. जिथे पडतो तिथे खूप पडतोय. कधी दुष्काळ पडतोय. कधी पाऊस सगळंच वाहून नेतो. इथूनही फटका पडतोय, तिथूनही फटका पडतोय. बिचारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काम करत आहेत. या सगळ्याचं ग्लोबल वॉर्मिंग हे प्रमुख कारण आहे”, असं भुजबळ म्हणाले.
बाळासाहेब आणि शिवसेनेच्या कृपेने…
दरम्यान, यावेळी छगन भुजबळांनी ते मुंबईचे महापौर असतानाची एक आठवण सांगितली. स्वच्छता महत्त्वाची असल्याचं सांगताना ते म्हणाले, “बाळासाहब ठाकरे आणि शिवसेनेच्या कृपेनं मी मुंबईचा महापौर होतो. पण प्रचंड कचरा निघायचा. लाखो टन कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न होता. नाशिक, पुणे सगळीकडे प्रत्येकाला वाटतं की कचरा टाकण्याची व्यवस्था हवी. पण माझ्याघराजवळ कचरा नको. पण या कचऱ्याचं पुढे काय करायचं याच्या काही शास्त्रीय पद्धती आता समोर आल्या आहेत”, असं ते म्हणाले.
मित्रा आणि मित्रों!
आपल्या भाषणाच्या शेवटी छगन भुजबळांनी या संस्थेचं नाव असलेल्या मित्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव असलेल्या मित्रों या शब्दांची देखील सांगड घालून खोचक टिप्पणी केली. “या संस्थेचं नाव मला फार आवडलं. मित्रा. आत्तापर्यंत आमच्या आदरणीय पंतप्रधान महोदयांचा मित्रों हा शब्द इतका गाजला, तशीच आमची ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले आणि उपस्थितामध्ये हास्याची एक लकेर उमटली.