Chhagan Bhujbal vs Suhas Kande : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमधील हिवाळी अधिवेशाच्या सुरुवातीला मंत्रिडळाचा विस्तार झाला. यामध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार) छगन भुजबळ यांना संधी न दिल्याने ते पक्ष नेतृत्त्वावर प्रचंड संतापले आहेत. अशात छगन भुजबळांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुहास कांदे यांनी “भुजबळांचे जेव्हा वाईट होते तेव्हा मी नेहमीच खुश असतो”, असे म्हटले आहे.
भुजबळांचे वाईट होते तेव्हा…
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर टीव्ही ९ मराठीशी बोलताना कांदे यांना, तुम्ही खुश दिसत आहात असे विचारण्यात आले. तेव्हा याला प्रतिक्रिया देताना आमदार सुहास कांदे म्हणाले की, “मी अजित दादांचे अभिनंदन करायला गेलो होतो. जेव्हा भुजबळांचे काही वाईट होते तेव्हा मी नेहमीच खुश असतो. भुजबळांनी केलेल्या वाईट कृत्याचे जेव्हा त्यांना फळ मिळते तेव्हा मला आनंद होतो.”
छगन भुजबळ भाजपात जाणार असलेल्या चर्चांबाबत कांदे यांना विचारले असता ते म्हणाले, “त्यांच्यात वेगळे होण्याची हिम्मत नाही. त्यांना आव्हान देतो की त्यांनी वेगळे होऊन दाखवावे.”
कांदे-भुजबळ संघर्ष
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघामुळे आमदार सुहास कांदे आणि भुजबळ कुटुंबीयांमध्ये मोठी स्पर्धा आहे. २००९ आणि २०१४ मध्ये या मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी सुहास कांदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी पंकज भुजबळांना पराभूत केले होते. त्यामुळे यंदा कांदेंना पराभूत करण्यासाठी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ राष्ट्रवादीतून (अजित पवार) बाहेर पडत नांदगाव मतदारसंघातून लढले होते. मात्र, यामध्येही सुहास कांदे यांनी बाजी मारली होती.
छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही
हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूरमध्ये महायुती सरकारच्या मंत्रिंडळाचा विस्तार झाला. यामध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्यानंतर, त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी पक्ष आणि नेतृत्त्वावरही टीका केली होती. याचबरोबर भुजबळांनी समर्थकांचा मेळावा घेत शक्तीप्रदर्शनही केले होते.