बारामती / पुणे : ‘आरक्षणाबाबत सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वजण येणार होते. मात्र आयत्या वेळी बारामतीतून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला, अशा शब्दांत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी टीका केली. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसन्मान सभे’मध्ये ते बोलत होते.
हेही वाचा >>> Sharad Pawar Group Post video: “सभेतल्या रिकाम्या खुर्च्या तुमचं…”, अजित पवारांच्या सभेवर शरद पवार गटाची बोचरी टीका
आरक्षणावरून सुरू असलेल्या मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. ‘आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याऐवजी विरोधकांना काही तरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटविण्याचे काम केले जात आहे,’ असा आरोप भुजबळ यांनी केला. ते म्हणाले, की सर्वक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांना बोलावले होते. बैठकीला शरद पवार यांनीही यावे, अशी विनंती आव्हाड यांना केली होती. ज्या वेळेस असे प्रश्न निर्माण होतात, त्या वेळी ज्येष्ठ नेते म्हणून पवार यांनीही यायला हवे होते, असे भुजबळ म्हणाले. निवडणुकीत तुम्ही तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडू. पण, सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दाम शांत का बसता आहात, असा सवाल त्यांनी केला. हे भाषण सुरू असताना ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी होत होती.
बारामतीत सर्व समाजाचे लोक आहेत. या सगळ्यांनी जशी सुनेत्रा पवारांना मते दिली, तशी सुप्रियाताईंनाही दिली. या सगळ्यांचे संरक्षण करणे तुमचे काम नाही का? तुमचा राग अजित पवारांवर असेल, छगन भुजबळांवर असेल, पण ओबीसीनी काय घोडे मारले आहे? राज्यातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी मुद्दाम यायचे नाही, हे योग्य नाही. – छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री