गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खुद्द छगन भुजबळ यांनीच माध्यमांना यासंदर्भातली माहिती दिली आहे. भुजबळांच्या नाशिक येथील कार्यालयात हे धमकीचं पत्र आलं असून त्यामध्ये “तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी घेतली आहे”, असा उल्लेख असल्याचंही भुजबळांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

छगन भुजबळांनीच माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात हे धमकीचं पत्र आलेलं आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची सुपारी मारेकऱ्यांनी घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, त्यांना ठार करण्याचा कट रचण्यासाठी कुठल्या हॉटेलसमोर बैठक झाली. त्यातील गाड्यांचे क्रमांक काय आहेत वगैरे अशी माहिती देण्यात आल्याचं भुजबळ म्हणाले.

“मला आयुष्यात अशी बरीच धमकीची पत्रं आली”

“आयुष्यात मला अशी खूप धमकीची पत्रं आली. तसे प्रयत्नही झाले. पण आपण हे सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं. आता घरी तर बसू शकत नाही. आपण घेतलेली भूमिकाही बदलू शकत नाही. जे काही परिणाम व्हायचे ते होतील. आपण पोलिसांना याची सगळी माहिती पुरवलेली आहे. पोलीस या सगळ्याचा शोध घेतील. महाराष्ट्रात अलिकडे जे प्रकार महाराष्ट्रात घडतायत, ते पाहाता आमच्या लोकांनी ताबडतोब ते पोलिसांना कळवलं आहे. मोबाईल नंबर, गाड्यांचे नंबर असं सगळं आहे त्यात. कुठे बैठक झाली, कुणाचा मोबाईल नंबर अशी बरीच माहिती पत्रात आहे”, असं भुजबळ म्हणाले.

घोसाळकर प्रकरणात गृहमंत्री काय करणार ?, छगन भुजबळ यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचा बचाव

“पूर्वी सुपाऱ्या घेऊन गँगवॉर व्हायचे”

दरम्यान, पूर्वी सुपाऱ्या घेऊन होत असलेले गँगवॉर आपण गृहमंत्री असताना आटोक्यात आले होते, असा उल्लेख भुजबळांनी केला आहे. त्यामुळे हा थेट देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला मानला जात आहे. “हे धक्कादायक आहे हे खरंच आहे. पूर्वी सुपाऱ्या घेऊन गँगवॉर व्हायचं. मी गृहमंत्री असताना ते आटोक्यात आलं होतं. पण आता ठीक आहे. जे आहे ते आहे. पोलीस त्यावर नक्कीच कारवाई करतील. ही धमकी नेमकी कशासाठी दिली, हे त्यांना पकडल्यानंतर लक्षात येईल. अशा कितीही धमक्या आल्या, प्रत्यक्षात त्या धमक्या अंमलात जरी आल्या, तरी मी माझी विचारसरणी सोडू शकत नाही”, असं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal threaten for life letter in nashik office amid maratha reservation protest pmw
Show comments