सध्या राष्ट्रवादीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेना या पक्षातून सुरुवात झाली. ते शिवसेनेचे पहिले आमदार होते. मात्र पुढे त्यांनी बंडखोरी करत शिवसेना पक्ष सोडला. त्यांनी काही आमदारांनी घेऊन बंडखोरी केल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ठिकठिकाणी त्यांना शिवसैनिकांकडून विरोध होत होता. त्याचीच आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली आहे. तेव्हा शिवसेना पक्षात येण्याची संधी होती. मात्र पक्षाबाहेर जाण्यासाठी रस्ता नव्हता, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘एबीपी माझा’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा >>> मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, पण मुंबई महापौरपदाच्या कारकिर्दीवर विशेष प्रेम; छगन भुजबळांनी सांगितलं कारण, म्हणाले…

मी जेव्हा शिवसेना पक्ष सोडला तेव्हा मला काही शिवसैनिक मारायला आले होते. तेव्हा माझ्यासोबत ३६ आमदार होते. त्यातील १८ तर आलेच नाही. पुढे विधानसभा अध्यक्षांसमोर आम्ही शिवसेना सोडली असे सांगितले. या १८ आमदारातील ६ आमदार परत मुंबईला गेले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला तेव्हा माझ्यासोबत १८ आमदार होते. त्यामुळे शिवसेनेची फाळणी झाली असे स्पष्ट झाले. पुढे पाच सहा दिवसांत १८ आमदारांमधील परत सहा आमदार गेले. मात्र आमची आमदारकी वाचली होती, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने का हुलकावणी दिली? सांगितलं नेमकं कारण; काँग्रेसनेही दिली होती ऑफर, पण…

पुढे ज्या लोकांनी बंड केले त्यातील एक-दोन निवडून आले. बाकीचे काही विशेष करू शकले नाहीत. तेव्हाचे पोलीस कमिशनर आम्हा १२ आमदारांना सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. आम्हाला शोधण्यासाठी सगळेच पूर्ण तयारीत होते. आमच्या मनात भीती होती. आम्ही भेटलो असतो तर त्यांनी (शिवसैनिक) सोडले नसते. मी मुंबईत विशेष विमानाने परतलो होतो. तेव्हा रस्त्यावर माझगावच्या घरापर्यंत काचेचा सडा पडला होता. मी कुठे चाललो की आडवे यायचे, दगडफेक व्हायची. डोकी फुटायची. तेव्हा काँग्रेसचे नेते मध्ये यायचे नाहीत. माणूस शिवसेनेत जाऊ शकतो. पण बाहेर येण्यासाठी रस्ता नाही, अशी तेव्हा परिस्थिती होती. आता शिवसेनेत सात-आठ दरवाजे उघडे आहेत, असे भुजबळ म्हणाले.