इंदापूरमध्ये आयोजित ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी रोखठोक भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी बीडमधल्या आंतरवाली सराटी गावात सुरुवातीला पोलिसांना मारहाण झाली होती त्यानंतर लाठीचार्ज झाला होता हे देखील पुन्हा सांगितलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेलं उत्तरही वाचून दाखवलं. त्यांच्या उत्तरातही हाच उल्लेख असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना येवल्याचा येडपट असं म्हटलं होतं त्याचाही आज भुजबळांनी आपल्या खास शब्दांमध्ये समाचार घेतला.
मनोज जरांगेंबाबत काय म्हणाले भुजबळ?
“हा (मनोज जरांगे पाटील) मला काय म्हणतो येवल्याचं येडपट, म्हणजे मी.. आता बघा १९८५ मध्ये त्याचा जन्म झाला होता का? माहीत नाही. त्यावेळेला मी मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही झालो. एक नाही दोन पदं भुषवली. मी देशाच्या महापौरांचा अध्यक्षही झालो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव. याच्या डोक्यात हवा गेली आहे. लोकांनी उगाच याला महत्त्व दिलं आहे.”
हे पण वाचा- “हमारे दुःख पर मीठ क्यूँ चोळते हो?” म्हणत छगन भुजबळांनी केली मनोज जरांगे पाटील यांची नक्कल
गाढवाचं उदाहरण देत काय म्हणाले छगन भुजबळ?
“तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या गावात पाण्याची टाकी असते ना ती पाच-सहा माळ्याच्या इमारतीएवढी उंच असते. एक दिवशी सकाळी सकाळी काही काही तरुण पोरं पाण्याच्या टाकीखाली जमले आणि त्यांची चर्चा सुरु झाली. तेव्हा एक वयस्कर म्हातारबुवा पाटील आले म्हणाले काय रे पोरांनो काय झालं कशाला जमली? तेव्हा पोरं त्यांना म्हणाली अहो काय करायचं ते बघा टाकीवर गाढव चढलं आहे वरती. त्याला खाली कसं आणायचं याची चर्चा आम्ही करतो आहोत. त्यावर ते पाटील म्हणाले त्या गाढवाला खाली कसं आणायचं ते आपण बघू, पण त्याला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? आता सगळे डोक्याला हात लावून बसले याला कसं खाली काढायचं? अरे याला तुम्ही वरती नेलं तेव्हा काही बोलला नाहीत आता डोक्याला हात लावून बसले.”
गावबंदी काय ठराविक पक्षांनाच आहे का?
“सध्या चाललंय काय? गावबंदी. काय गावबंदी बाबा? मी कुठेही गेलो ना की गावबंदी. घनसावंगी गावात गेलो तिथे दोन फ्लेक्स होते. एक मराठा आरक्षण गावबंदी कुणीही यायचं नाही. त्याच्या शेजारीच दुसरा बोर्ड आहे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या यात्रेचं हार्दिक स्वागत. बाकीच्यांना गावबंदी यांचं स्वागत. त्यानंतर ते गावात गेले त्यानंतर भाषण वगैरे केले. एका पोराने गावबंदीवर प्रश्न विचारले त्याला खाली बसवलं. दुसऱ्या दिवशी तो पोरगा हॉस्पिटलमध्ये होता कारण त्याला मारझोड करण्यात आली.” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मी मागेही पोलिसांना सांगितलं की गावबंदीचे बोर्ड काढून टाका. घटनेनुसार कुणीही कुठल्या गावात जाऊ शकतो. गावबंदीचे बोर्ड काढले जात नाहीत. ठराविक लोकांना गावात प्रवेश दिला जातो. त्यांना प्रश्न विचारला गेला तर मारहाण होते आहे. घाणेरडे मेसेज केले जात आहेत. रुपाली चाकणकर यांनाही घाणेरडे मेसेज पाठवले जात आहेत. ते काहीही करत आहेत त्यांना सगळी मुभा आहे असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला.