राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेत आपण १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राज्यभरात या विषयाची चर्चा रंगली. जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत असा आरोप केला. तर मनोज जरांगे पाटील यांनी एकेरी भाषेचा उल्लेख करत, ‘तू राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी मार, मराठा आरक्षणाबाबत बोलू नको, मधे पडू नको’ अशी प्रतिक्रिया दिली. या सगळ्या घडामोडी घडत असताना आज मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा काही लोक पोस्ट लिहून व्यक्त होत आहेत ते समितीपुढे का बोलत नाहीत? असा सवाल केला. ज्यानंतर छगन भुजबळ यांनी राजीनामा का दिला? १६ नोव्हेंबरला काय घडलं होतं ते सगळं काही माध्यमांना सांगितलं आहे.
संजय गायकवाड काय म्हणाले होते?
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी त्याचा विरोध केला होता. या विरोधानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे सांगितले. “त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा”, असेही विधान संजय गायकवाड यांनी भुजबळ यांच्याबद्दल केले होते.
“छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात?”, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत टीका केली होती. त्यानंतर भुजबळ यांनीही त्यांना उत्तर दिलं. आज छगन भुजबळांनी मात्र १६ नोव्हेंबरला काय झालं ते सगळंच सांगितलं आहे.
हे पण वाचा- महात्मा जोतीराव फुले यांना भारतरत्न कशाला? छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले…
छगन भुजबळ काय म्हणाले?
“मी १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला तेव्हा कुणालाच माहीत नव्हतं मी काय करणार. त्यावेळी एकानेही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. विरोधी पक्षाने नाही किंवा कुणीही नाही. मला १७ नोव्हेंबरला माझी भूमिका मांडायची होती म्हणून मी राजीनामा दिला. त्यानंतर मला फोन करुन सांगण्यात आलं की तुम्ही वाच्यता करु नका. मी दौऱ्यावरुन आल्यानंतर मला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची भूमिका मांडा पण राजीनाम्याची वाच्यता करु नका. त्यामुळे मी शांत राहिलो. विरोधी पक्ष मागणी करत आहेत, सत्तेतले आमदार कमरेत लाथ घालून बाहेर काढा अशी भाषा करु लागला तर लोक काय म्हणतील? छगन भुजबळ लोचट आहे. आमदार लाथ घालेन सांगत आहेत आणि राजीनामा देत नाहीत. म्हणून मी राजीनाम्याची वाच्यता केली.” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
नाभिक समाजाबाबत जे बोललो तो विषय एका गावापुरता होता
नाभिक समाजाच्या बाबतीत काही लोकांनी, आमच्या विरोधकांनी चुकीची गोष्ट दाखवली, सांगितली. माझ्याकडे मी काय बोललो त्याची क्लिपिंग आहे. मी एका गावात गेलो होतो त्या गावातल्या नाभिक समाजाच्या माणसाने पोस्ट टाकली त्यामुळे त्या गावातल्या मराठा समाजाने सांगितलं या दुकानावर बहिष्कार टाका कुणीही या दुकानात जायचं नाही. मी म्हटलं मराठे बहिष्कार टाकत आहेत, तर त्या गावातल्या नाभिक समाजाने तुमच्या सगळ्यांवर बहिष्कार घातला तर तुम्ही काय करणार? असा प्रतिसवाल मी केला होता. त्या गावापुरतं प्रकरण होतं, माझं बोलणं तोडून मोडून प्रसारित करण्यात आलं. जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात आहेत. मी एका गावाच्या संदर्भात मी बोललो होतो. ज्याच्यावर बहिष्कार टाकला होता त्यासंदर्भात मी बोललो होतो. असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
एका घराचं सर्वेक्षण करायचं असेल तर दीड तास लागतो
एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण होणं शक्य आहे का? एका घराचं सर्वेक्षण करायचं असेल तर १८० प्रश्न आहे. दीड तास एका घरासाठी लागतो. आठ ते दहा तासात पाच ते सात सर्वे होतील. जात विचारली जाते बाकी १७९ प्रश्नांची उत्तरं आपोआप भरली जात आहेत. अशा प्रकारे सर्व्हे केलं जात आहेत. असाही आरोप छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.