गेल्या दोन दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. विशेषत: अजित पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार? यावर बरेच तर्क लावण्यात आले. एकीकडे पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर होतं, तर दुसरीकडे छगन भुजबळ उमेदवारीमुळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झालं असून त्यांनी विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी छगन भुजबळांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहात का? अशी विचारणा केली असता त्यांनी त्यावर सूचक विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले छगन भुजबळ?

सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज माध्यमांशी बोलताना भुजबळांनी त्याबाबत माहिती दिली. “काल आमच्या मंत्रीमंडळातील सर्व सदस्य आणि पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांची एक बैठक झाली. त्यात सविस्तर चर्चा झाली. त्या विचारांती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“मी त्या पदासाठी इच्छुक होतो. माझ्यासह आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी असे ४-५ लोक इच्छुक होते. पण शेवटी पक्षात सर्वानुमते निर्णय झाला आहे”, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पुन्हा एकाच कुटुंबात पदांचं वाटप?

दरम्यान, खुद्द अजित पवार यांच्याकडे पक्षाध्यक्षपद, सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद, इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आधी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी, त्यात पराभव झाल्यानंतरही आता राज्यसभेची उमेदवारी या सगळ्यामुळे पुन्हा एकाच कुटुंबात महत्त्वाची पदं जातायत असं वाटत नाही का? असा प्रश्न छगन भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर भुजबळांनी अजित पवारांची पाठराखण केली.

“इथे एकाच कुटुंबात पदं देण्याचा कुठे प्रश्न आहे? अजित पवार कुठे काय म्हणाले? मंत्रीमंडळातल्या आणि आमच्या कोअर ग्रुपच्या नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यात अजित पवारांना बोलण्यात काय अर्थ आहे? हा त्यांचा निर्णय नाहीये, आमचा सगळ्यांचा निर्णय आहे”, असं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ उमेदवारीवरून नाराज?

आपण उमेदवारीमुळे नाराज नसल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलं. “माझ्या तोंडावर नाराजी दिसतेय का? काय संबंध? मी अजिबात नाराज नाहीये. पक्षात सगळ्यांना सोबत घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. हे मी ५७ वर्षांपासून शिकतोय. शिवसेनेत असताना, शरद पवारांसोबत असताना, काँग्रेसमध्ये असतानाही सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात हे शिकलो. त्याप्रमाणे ते घेतले आहेत. सगळं तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही”, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

“पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…”, सुनेत्रा पवारांबाबतच्या चर्चांवर रोहित पवारांचा टोला; म्हणाले, “काकी आणि पार्थ यांना…”

लोकसभेसाठीही इच्छुक होते छगन भुजबळ!

लोकसभा निवडणुकीपूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघातूनही छगन भुजबळ निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. पण श्रीकांत शिंदेंनी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याच्याही आधी नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे उमेदवार असतील असं जाहीर सभेत सांगितलं होतं. अंतिमत: हेमंत गोडसे यांनाच तिथून महायुतीची उमेदवारी निश्चित झाली. पण ठाकरे गटाचे राजाभाऊ वाझे यांनी हेमंत गोडसेंचा तब्बल १ लाख ६२ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या मतदासंघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची ४७ हजार १९३ मतं मिळाली, तर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना ४४ हजार ५३४ मतं मिळाली.