मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने त्यांची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, लाखो मराठा बांधवांना घेऊन आम्ही २० जानेवारी रोजी मुंबईत चक्काजाम आंदोलन करू, तसेच मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदल उपोषणाला बसेन. दुसऱ्या बाजूला, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि छगन भुजबळ सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. अशातच भुजबळ यांनी शनिवारी (१३ जानेवरी) बीड येथे ओबीसी एल्गार मेळावा घेऊन ओबीसींबाबत आक्रमक भूमिका मांडली.
ओबीसी एल्गार मेळाव्यात भुजबळ यांनी सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना सुनावलं. भुजबळ म्हणाले, जे नेते याप्रकरणी शांत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही काहीच बोलणार नाही. परंतु, जे आमच्याविरोधात त्यांना (मनोज जरांगे यांना) शक्ती देत आहेत त्यांना मात्र आम्ही कधीच विसरणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सध्या जे काही चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे की, तुम्ही असं समजू नका केवळ तेच सगळं काही आहेत आणि आम्ही कोणीच नाही.
छगन भुजबळ म्हणाले, ते (मनोज जरांगे) राष्ट्रीय नेत्यांना सांगत आहेत की आमचा मोर्चा मुंबईत येणार आहे. आमच्या पाठिशी उभे राहा. ते नेतेही सांगतात, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. मला त्या नेत्यांना सांगायचं आहे. तुम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहा. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. वेगळ्या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी उभे राहणार असाल तर माझं काहीच म्हणणं नाही. याबाबतीत मीसुद्धा तुमच्याबरोबर आहे. परंतु, ते (मनोज जरांगे) म्हणतात ओबीसीतूनच आरक्षण घेणार. त्यांची अशी भूमिका असेल तर मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, ओबीसीत मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही.
हे ही वाचा >> “…अन् जवान नेते हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार”, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोमणा
छगन भुजबळ म्हणाले, दंडुके काय… पिस्तुलं काय… मला त्यांना सांगायचं आहे, बेटा छोड दे यह हथियारों की बात, बेटा छोड दे यह हथियारों की बात, वरना सब मिट्टी में मिल जाय. तू हमसे क्या टकरायेगा, जो जो हमसे टकराये हैं, सब मिट्टीमे मिल जाय. क्या तुम हमसे टकराओगे? हथियारों की बात करता हैं…