राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (दि. ३ फेब्रुवारी) अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करत असताना १६ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा खुलासा केला. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला त्यांनी विरोध केला. तसेच कोल्हापूरमधील नाभिक समाजाच्या एका तरूणाबरोबर झालेल्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर छगन भुजबळांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

“नाभिक समाजातील एकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली तर मराठा समाजाने सांगितलं की याच्या दुकानात जायचं नाही. मी सर्व नाभिक समाजातील बांधवांना आवाहन करतो की असा बहिष्कार घालणार असतील तुम्हीही एकाही मराठ्याची हजामत करायची नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

हेही वाचा >> “नाभिक समाजाने मराठ्यांवर…”, भुजबळांच्या त्या आवाहनावर जरांगे पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया

छगन भुजबळांच्या या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला. मनोज जरांगे पाटलांसह जितेंद्र आव्हाडांनीही यावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रभर छगन भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानतंर छगन भुजबळांनी आता आपल्या वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

छगन भुजबळांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“मी त्या गावाचं नाव घेऊन सांगितलं होतं की एका नाभिक समाजातील बांधवाने ओबीसींच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली तर त्याच्यावर बहिष्कार घालण्यात आला. मी म्हटलं की नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला तर तुम्ही एकमेकांचे केस कापत बसणार आहात का? ते वक्तव्य जनरल नव्हतं. त्या संबंधित बांधवावर झालेल्या अन्यायासंदर्भात वक्तव्य होतं. हे सर्व नाभिक समाजाला आणि मराठा समाजाला लागू होत नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगेंनी काय टीका केली होती?

“भुजबळ यांचे विचार खालच्या दर्जाचे आहेत. गोरगरीब जनता उपाशी राहावी, ही त्यांची इच्छा दिसते. मग ते स्वजातीय असोत किंवा मराठा समाजाचे असोत. त्यांच्या विचारांना आम्ही सुधारू शकत नाहीत. जे गरीब नाभिक आपला व्यवसाय करतात, त्यांनाही आता व्यवसाय करू द्यायचा नाही, असे भुजबळांचे स्वप्न दिसते”, असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbals explanation of that statement of nabhik community and maratha sgk