वाई : सातारा शहरातील पोवई नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही स्मारक असू नये. हे सांगण्यासाठी छत्रपती कल्पनाराजे भोसले या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. या परिसरात दुसरे कोणतेही स्मारक झाले तर जनक्षोभ उसळेल असेही कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
मी स्वतः सर्व संबंधितांशी बोलेन सातारा शहरात शिवतीर्थ पोवई नाका परिसरात शिवप्रेमींच्या भावना विचारात घेऊनच निर्णय होईल. आपण निश्चिंत रहा अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी दिली. त्यांनी मुंबई येथे जाऊन वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ऐतिहासिक पोवई नाक्याचे महत्व त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही नाही असा पुतळा या ठिकाणी शिवाजी सर्कल येथे आहे.
अलीकडे या भूमीला शिवप्रेमींनी शिवतीर्थ हे नाव दिले आहे. याच परिसरात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी त्यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा चौक सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला सातारकरांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रपती घराण्यातील कर्तृत्ववान राजांच्या व्यतिरिक्त त्या परिसरात कोणाचेही पुतळे व स्मारक उभे होऊ देणार नाही तसा प्रयत्न झाला तर जनक्षोभ उसळेल अशी माहिती कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
शिवप्रेमी व सामाजिक संघटना या विषयात आक्रमक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकभावनेचा विचार करून आपण केला पाहिजे असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. शिवप्रेमींची भावना व लोकभावना विचारात घेऊन पोवई नाक्यावरील निर्णय होईल त्या संदर्भात आपण स्वतः सर्व संबंधितांशी बोलू असे मुख्यमंत्र्यांनी आपणास सांगितल्याचे छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी खासदार उदयनराजे समर्थक पंकज चव्हाण उपस्थित होते.