मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य शासनानं छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना केली होती. राज्यात कार्यरत असलेली ही संस्था बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. याविरोधात संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. “अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व स्तरांवर पाठपुरावा करत आहे. पण, काही निर्णय होताना दिसत नाही. म्हणून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गानं, कुठलाही कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गानं आम्ही हा लढा उभारणार आहोत,” असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

राज्यात काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील तरूणांसह समाजाच्या विकासासाठी सारथी संस्थेची स्थापना केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संस्था चर्चेत आली आहे. प्रशासनातील काही अधिकारी किरकोळ स्वार्थापोटी सारथी संस्थेला बदनाम करून बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांना लाक्षणिक उपोषणाची हाक दिली आहे. यासंदर्भात संभाजीराजे यांनी ट्विट करून भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले संभाजीराजे?

मी सारथी संस्थेसाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे कळताच, महाराष्ट्रातील हजारो युवकांनी आणि समाज धुरिणांनी पाठिंबा देत असतानाच काळजीही व्यक्त केली. हजारो लोक उद्या पुण्याच्या दिशेने येण्याच्या तयारीत आहेत. समाजमाध्यमातून अनेकजण पाठिंबा व्यक्त करताना दिसत आहेत. मराठा समाजाच्या हक्कांसाठी मी गेली अनेक वर्षे लढत आहे. मला मराठा समाजाची बाजू मांडताना कधीही संकोच वाटला नाही. अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्हाला एका विशिष्ट जातीच्या मर्यादेत बघितलं जाईल. मग तुम्ही राजकारण कसे काय करणार?

माझी भूमिका ही सुरुवातीपासून स्पष्ट आहे, मला राजकारणापेक्षा समाज महत्त्वाचा वाटतो. मी शिवशाहूंचा वारसदार आहे. सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन त्या सर्वांचा उत्कर्ष करण्याची शिकवण माझ्या घराण्यातील पूर्वजांनी दिली आहे. आम्हाला सर्व जाती, सर्व समाज समान आहेत.

आज घडीला मराठा समाज हा अत्यंत विपरित परिस्थितीतून वाटचाल करतोय. तो अडचणीत सापडलाय. महाराष्ट्रात मोठा भाऊ म्हणून ओळखला जाणारा, ग्रामीण समाज व्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा समाज सर्व बाजूंनी पिछेहाटीच्या मार्गावर आहे. त्यांची बाजू कुणीतरी मांडलीच पाहिजे.

मराठा समाजाचा आजपर्यंत केवळ राजकारणासाठी वापर झाला. त्यांच्या मूळ दुखण्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. आरक्षणाचा लढा असेल किंवा इतरही अनेक मागण्या असतील, त्यासाठी मी जमेल तितके प्रयत्न करत असतो. आज सारथीसारखी अत्यंत उपयुक्त असलेली संस्था काही अधिकारी व काही झारीतील शुक्राचार्य मिळून किरकोळ स्वार्थासाठी बंद पाडत असतील, तिला बदनाम करण्याचा घाट घालत असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही.

अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व त्या स्तरावर पाठपुरावा करत आहे. पण निर्णय काही होताना दिसत नाही. म्हणून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार आहोत.

Story img Loader