लग्न हा एक पवित्र सोहळा मानला जातो. असं म्हणतात की लग्नात फक्त पती पत्नी एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंबही एकत्र येतात. पण ही दोन कुटुंब जर एकमेकांच्या विरोधात उभी राहिली तर? ते देखील लग्न मंडपातच? तर काय होईल? छत्रपती संभाजी नगरमध्ये असाच एक राडा झाला आहे. वर पक्ष आणि वधू पक्ष यांच्यात जोरदार हाणामारी झाली त्यामुळे या दोन्हीकडच्या लोकांना मंडपातून थेट रूग्णालयात न्यावं लागलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा या गावात एक लग्न समारंभ होता. या लग्नाला पुण्याहून वऱ्हाडी आले होते. या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे शनिवारी लग्न सोहळा पार पडला. मात्र यावेळी वधू पक्ष आणि वर पक्षात वाद झाला. सुरूवातीला हा वाद किरकोळ होता. पण नंतर या वादाचं रूपांतर राड्यात झालं.
लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुण्याहून आलेल्या वऱ्हाडातील काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद चिघळला. हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं रूप आलं. कारण शाब्दिक बाचाबाची थेट हाणामरी होईपर्यंत पुढे गेली. एबीपी माझाने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
वर आणि वधू पक्षातले १० ते १२ जण जखमी
दोन्ही गटातील तरूण एकमेकांवर हल्ला चढवत होते. यात महिलांना मारहाण करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांकडून वाद वाढला. यात दोन्ही बाजूचे १० ते १२ जण गंभीर जखमी झाले. जखमींना पाचोडच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. तर किरकोळ जखमींना व्यक्तींना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
लग्नात मानपानावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत गेला आणि दोन्ही बाजूचे तरूण एकमेकांना भिडले थेट मारामारी सुरू झाली. एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. दोन्ही गटांमधील लोकांनी पोलिसात तक्रार केलेली नाही. पण लग्नात झालेल्या हाणामारीची जोरदार चर्चा सुरू झाली.