अलिबाग: छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे राज्याच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली. ते किल्ले रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान बोलत होते. सरकार अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करीत असते. आमदार खासदारही आपल्या मतदार संघात हजारो कोटींची कामे आणतात. मग गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी का निधी उपलब्ध होऊ शकत नाही. राज्यात छत्रपती शिवरायांचे ३५० हून अधिक गडकिल्ले आहेत. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी २ हजार कोटी सरकारने द्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्तेत असलेल्या आणि नसलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि कर्तृत्व जगभरात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्याला तमाम शिवभक्तांच्यावतीने आपल्याला निमंत्रित करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली. किल्ले रायगडच्या या प्रतिकूल परिस्थितीत लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावर येत असतात. मिळेल त्या वाहनाने, सायकलवरुन, काहीजण चालत या शिवराज्याभिषेक सोहोळयाला येतात. इतके प्रेम जगात कोणाला कुठेही पहायला मिळत नाही, हे प्रेम ज्यांनी आपल्यासाठी स्वराज्य स्थापन केले, त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांसाठीच पहायला मिळते.
हेही वाचा : वेळ… आज तुमची, उद्या माझी येईल – चंद्रहार पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:साठी राज्याभिषेक केला नाही, तर हे स्वराज्य जनतेसाठी निर्माण केले. अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, न्यायाची भूमिका घेण्यासाठी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असेही ते म्हणाले. या शिवराज्याभिषेक सोहळ्यास युवराज शहाजीराजे, युवराज्ञी संयोगिता राजे, खा.ओमराजे निंबाळकर, आ. रोहित पवार, माजी आ. अनिकेत तटकरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील, संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज देहूचे प्रशांत महाराज, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड उपस्थित होते.