कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने युवराज छत्रपती संभाजीराजे यांना सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्एयाही एका पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी अट घातली आहे. तथापि, संभाजीराजे यांनी मात्र आपण स्वराज्य पक्षाकडूनच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे ट्विट गुरुवारी सायंकाळी केले आहे.
हेही वाचा >>> मराठा सर्वेक्षणाला आणखी दोन दिवस मुदतवाढ?मराठा सर्वेक्षणाला आणखी दोन दिवस मुदतवाढ?
लोकसभा निवडणुकीसाठी नवनवीन मित्र जोडण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. या अंतर्गत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनाही आघाडीमध्ये सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यापैकी एका पक्षात प्रवेश करून स्वराज्य पक्ष विलीन करावा, अशी अट घातल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ‘ स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे ,’ असे ट्विट करीत महाविकास आघाडीचा हा प्रस्ताव नाकारल्याचे दिसत आहे.