छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन को ऑप. बँकेतील ९७.४१ कोटींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने २१ ऑगस्ट रोजी बँकेच्या दोन व्यवस्थापकांसह ८ आरोपींना अटक केली. या आठही जणांना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एम. जमादार यांनी गुरुवारी दिले.
विशेष म्हणजे प्रकरणाचा तपासासाठी आरबीआयने पुढाकार घेताच कथित कर्जदारांच्या नावे घेतलेले कर्ज एकाच वेळी रोख व आरटीजीएसच्या माध्यमातून कोट्यवधींच्या रक्कमा बँकेत जमा केल्या गेल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान उघडकीस आले. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष झांबड हे अजूनही पसार दहा महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत आहेत.
सोपान गोविंदराव डमाळे, गणेश आसाराम दांगोडे, ज्ञानेश्वर ऊर्फ शरद सारजाराम पवार, पोपट बाजीराव साखरे, राजू सावळाराम बाचकर, प्रशांत भास्करराव फळेगावकर-देशमुख, कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे, संदेश भिवसन वाघ, अशी आरोपींची नावे आहेत. यातील कल्याण दांगोडे आणि संदेश वाघ हे बँकेचे व्यवस्थापक आहेत. या दोघानी घोटाळयातील २२ प्रकरणात कर्ज मंजूर केल्याची माहिती तपासात पुढे आली. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी लोकाभियोक्ता नितीन धोंगडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपी दांगोडे आणि वाघ हे बँकेचे व्यवस्थापक आहेत. तर उर्वरित सहा जणांच्या नावे कर्ज घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे कर्ज घेतांना कर्जदारांचे संपूर्ण दस्ताऐवज घेण्यात आले नसल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हे कर्ज कोणाच्या सांगण्यावरुन देण्यात आले, याचा तपास करणे गरजेचे आहे. तसेच बँकेची आरबीआय मार्फ त चौकशी सुरु झाली तेंव्हापासून कर्जदारांनी कोट्यवधींच्या रक्कमा या एकरक्कमी आणि आरटीजीएसने एकगठ्ठा भरल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे गुन्ह्याचा सखोल तपास करणे महत्वाचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.
नेमका गुन्हा काय?
या प्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी फिर्याद दिलेली आहे. अजिंठा अर्बन बँकेचे चेअरमन सुभाष झांबड, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांनी संगनमत करून मार्च २००६ ते ऑगस्ट २००३ या कालावधीत ६४.६० कोटी रुपयांची मुदतठेव रक्कम बँकेच्या लेजर बुकमध्ये खोटी व बनावट दाखवली. तसेच ३१ मार्च २०२३ रोजी ३२.८१ कोटी रुपयांची रक्कम एसबीआय, क्सिस आणि एमएससी बँकेच्या खात्यात जमा असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून तसेच खोटा हिशेब दाखवून ताळेबंद तयार केला होता. संगनमत करून कर्जदारांना विनातारण कर्ज देऊन ९७.४१ कोटींचा अपहार केला होता. त्यामुळे बँकेचे चेअरमन सुभाष झांबड, सीईओ प्रदीप कुलकर्णी, सनदी लेखापाल सतीश मोहरे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.