Chhatrapati Sambhajiraje : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला आज २० दिवस झाले आहेत. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेतील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात विविध पक्षाचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या मोर्चात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी मोर्चाला संबोधित करताना छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री केलं तर मी स्वत: बीड जिल्ह्याचं पालकत्व घेईल’, असं म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी कडक शब्दांत ठणकावलं आहे.
हेही वाचा : Suresh Dhas: बीड जिल्ह्याची करुण कहाणी सांगताना सुरेश धसांकडून करुणा मुंडेंचा उल्लेख; म्हणाले, “तिची तर…”
छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?
“मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची एवढ्या निर्घृण पद्धतीने हत्या केली गेली. मग एवढी दहशत आहे हे दुर्देव आहे. मी जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटलो तेव्हा मला तेथील अनेक लोकांनी माहिती सांगितली. त्यांची मतं माझ्याबरोबर व्यक्त केली. मी याआधीही सर्वासमोर सांगितलं होतं की, या घटनेतील जो म्होरक्या आहे, त्या म्होरक्याला आश्रय देणाऱ्या धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका. पण तरीही त्यांना मंत्रिपद दिलं गेलं. आता त्यांचा (धनंजय मुंडे) राजीनामा घेतील की नाही मला माहिती नाही. पण बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला मला हे सांगायचं की जर त्यांना (धनंजय मुंडेंना) बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं तर मी स्वत: बीड जिल्ह्याचं पालकत्व घेणार”, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी ठणकावलं आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि जर या महाराष्ट्रात कोणी दहशत परवण्याचं काम करत असेल तर माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी येणं. हे काय चाललंय? बीडचा बिहार करायचा आहे का? हा महाराष्ट्र आहे. या घटनेला २० दिवस झालेत पण तीन आरोपी अद्याप सापडत नाहीत आणि त्या आरोपींचा म्होरक्याही सापडत नाही. हे कसं चालतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत बोलतात की हा म्होरक्या खंडणीच्या गुन्ह्यात दोषी आहे. मग अद्याप त्याच्यावर कारवाई का नाही? मात्र, यापुढे आम्ही ही दहशत खपवून घेणार नाहीत. अजित पवार म्हणतात की माझी काम करण्याची पद्धत परखड आहे. मग जर तुमची काम करण्याची पद्धत परखड असेल तर आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा. त्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.